साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीन बंधू आंबेडकर बोर्डिंग, जुनी दोस्त टॉकिज, घाट रोड, चाळीसगाव येथे जाहीर भाषण केले होते. त्या प्रसंगाला ८६ वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त बुधवारी, १९ जून रोजी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन सभा आयोजित केली होती. सभेत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रा.गौतम निकम लिखित ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची खान्देशातील भाषणे व वृत्तांत’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा स्मारक निर्मिती महाराष्ट्र शासनाने करण्यासाठी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून जनहितार्थ निवेदन देण्यात येत आहे की, १९ जून १९३८ (८६ वर्षे होत आहे) आणि २३ ऑक्टोबर १९२९ (९५ वर्षे होत आहे) या दोन्ही दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दिन बंधू आंबेडकर बोर्डिंग घाट रोड चाळीसगाव, नगर भूमापन क्रमांक ३३१४/१ क्षेत्र २४५ चौ.मी. जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा स्मारक निर्मिती महाराष्ट्र शासनाने करावी. कारण शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे-जेथे भेटी दिलेल्या जागेवर १२५ व्या जयंतीनिमित्त स्मारक बांधले. मात्र चाळीसगाव येथे कोणतेही स्मारक बांधण्यात आले नाही. या जागेला लागून घाट रोड पूर्वी दोस्त टॉकिज जागा होती, असेही निवेदनात नमूद केले आहे.
शेवटी शासनाला जनहितार्थ प्रमुख महत्त्वाच्या मागण्यांचे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. त्यात अत्याधुनिक सर्व सुखसोयी युक्त मुला-मुलींचे वस्तीगृह, जिमखाना उभारण्यात यावे, बुद्ध विहार, ध्यान सेंटर उभारण्यात यावे, प्रवेशद्वारात अशोक स्तंभ उभारण्यात यावा, राष्ट्रीय स्तरावर संदर्भ ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, इंटरप्रीनॉरशीप डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यात यावे, अत्याधुनिक प्रेक्षागृह डिजिटल प्रदर्शनी यंत्रणा उभारण्यात यावी, थ्री-डी इफेक्टद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्षात आपले विचार मांडताना दिसतात. यासंदर्भातील यंत्रणा आवश्यक आहे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी नासिर भाई शेख, रमेश अहिरे, तुषार जाधव, राहुल मोरे, आनंद गांगुर्डे, प्रमोद पाटील, अरूण पाटील, अशोक जाधव, चित्रसेन पाटील, आयुष्य गांगुर्डे, सुरेश जगताप, दामु मोरे, तुषार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.गौतम निकम, सुत्रसंचलन स्वप्नील जाधव तर आभार अमोल मोरे यांनी मानले.