संत नरहरी महाराजांची ७८२ वी जयंती उत्साहात साजरी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्ह्याच्यावतीने सुवर्णकार अर्थात सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७८२ वी जयंती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यालयात गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता साजरी करण्यात आली. याप्रसंगी शहराचे आ. सुरेश (राजूमामा) भोळे यांच्यासह सुवर्णकार समाजातील मान्यवरांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनासह आरती करण्यात आली.
याप्रसंगी आ. राजूमामा भोळे म्हणाले की, आजपासून संत नरहरी महाराजांच्या ७८२ व्या जयंतीनिमित्त सर्व सुवर्णकार समाजाच्यावतीने ७८२ वृक्षांचे रोपण झाले पाहिजे. त्यामुळे महाराजांचे विचार लोकांपर्यत वृक्षाच्यारूपाने पोहचतील.त्याला खत पाणी घातल्याने संतांचे विचार, समाजभान जपले जाईल.अशा संकल्पनेला उपस्थितांनीही दुजोरा दिला.
याप्रसंगी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष संजय विसपुते म्हणाले की, आ. राजुमामांच्या सहकार्याने आपण ७८२ वृक्षाचे शहराच्या विविध ठिकाणी वृक्षारोपण संकल्प करू या. महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव आणि एस. डी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात येईल. जिथे वृक्ष लावले जाईल, त्याची आजुबाजुच्या परिसरातील रहिवाशांनी काळजी घेवून वृक्षांना जपण्याचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यांची लाभली उपस्थिती
यावेळी माजी नगरसेविका तथा अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना विजय वानखेडे, महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखेडे, प्रकाश दापोरेकर, रमेश वाघ, संजय भामरे, सुहास दुसाने, विजय यादव, प्रशांत विसपुते, राजू रणधीर, मनोज सोनार तसेच अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्था जळगाव, महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव, अहिर सुवर्णकार महिला मंडळ, ऋणानुबंध वधू-वर पालक परिचय मेळावा समिती, संत नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्था मेहरूण, अहिर सुवर्णकार समाज सुधारक मंडळ, जळगाव जिल्हा सुवर्णकार कारागीर संघटना, सोनार कलामंच, एस.एन.एस. फाउंडेशन, सराफ बाजार सुवर्णकार कारागीर समूह यांच्यासह समाजातील विविध संस्थाचे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. केतन सोनार तर रतनकुमार थोरात यांनी आभार मानले.
