साईमत, वरणगाव : प्रतिनिधी
नगर परिषद तसेच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शहरातील विकास कामांचा प्रपोगंडा केला जात असला तरी शहराच्या विकास कामांबाबत दिव्याखाली अंधार असल्याची परिस्थिती समोर येत आहे. यामध्ये सिद्धेश्वर नगर भागात ६५ लाख रुपये खर्च करून निर्माण केलेल्या स्मशानभुमीत रात्री मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाद्वारे मयतावर अंतीम संस्काराची वेळ नातेवाईक व मित्र मंडळीवर आली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील विकास कामांच्या बाबतीत सद्यस्थितीत येणाऱ्या निवडणुकांचे लक्ष्य समोर ठेवून मोठ्या प्रमाणात प्रपोगंडा केला जात असल्याचे समोर येत आहे. यामध्ये शहराच्या प्रत्येक प्रभागातील माजी लोकप्रतिनिधी (नगरसेवक) माझ्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा पाढाच प्रभागात वाचून फिरतांना दिसत आहेत. मात्र, शहराच्या प्रत्येक प्रभागात शासन स्तरावरून प्राप्त होणाऱ्या निधीतून बहुतांश कामे अद्याप पूर्ण झाली नसुन झालेल्या विकास कामांच्या दर्जा बाबतीतही अनेक प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शहराचे अविभाज्य अंग असलेल्या सिध्देश्वर नगर भागात स्थानिक लोकांच्या मागणीनुसार २०१६-१७ मध्ये प्रभाग क्र. १८ मधील लोकप्रतिनिधींनी ६५ लाख रुपयांच्या निधीतून श्री नागेश्वर मंदिर ते विल्हाळे मार्गावर सुसज्ज अशा स्मशानभुमीची निर्मिती केली आहे. मात्र, स्मशानभुमीच्या निर्मितीला अवघे काही वर्ष होत नाही तोच स्मशानभुमीच्या दुरावस्थेचे चित्र समोर येऊ लागले आहे. यामध्ये स्मशानभुमीतील फरशी, पाणी पुरवठा, दशक्रिया विधीची जागा, वॉचमन रूम अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे वीज पुरवठ्याची आहे. स्मशानभुमीत सद्यस्थितीत लाईटच नसल्याने रात्री-अपरात्री मयतावर अंतिम संस्कार करतांना मयताचे नातेवाईक व मित्र मंडळींना मोबाईल टॉर्चद्वारे अंतीम विधीचे सर्व कार्य पार पाडावे लागत आहेत. यामुळे उपस्थितांमध्ये विकास कामाच्या नावाखाली अंधार असल्याची चर्चा चांगलीच रंगली असून संतापही व्यक्त केला जात आहे.
भुरट्या चोरट्यांवर नियंत्रण येणार का?
शहरातील अनेक भागात नगर परिषदेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून कचरा संकलनासाठी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्या, सार्वजनिक शौचालयातील साहित्यांची तोडफोड, कचरा संकलन करणाऱ्या जुन्या वाहनांचे पार्टस् लंपास, स्मशानभुमीतील साहित्यांची चोरी असे अनेक प्रकार भुरट्या चोरट्यांकडून होत आहेत. मात्र, शासकीय नुकसानीबाबत किरकोळ विषय समजुन नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जात नसल्याने भुरट्या चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे असे गैरप्रकार करणाऱ्या भुरट्या चोरट्यांवर नियत्रंण मिळविता येईल का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
