साईमत जळगाव प्रतिनिधी
कार्याचा सुगंध आणी बुद्धीचा प्रकाश याला जीवनात महत्व आहे. लेखक मनोहर राणे यांची पुस्तके जीवनदर्शक आहे. श्रीमदभगवद्गीता आत्मोन्नतीचा मार्ग आहे. आयुष्यात आपण स्वतःसाठी जगणे राहून जाते. त्यासाठी कुठेतरी स्वतःला जाणून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी केले.
सेवानिवृत्त शिक्षक मनोहर देवचंद राणे लिखित “भगवतप्रणीत जीवनरेखा (सकल जनांसाठी)” व “म्हाताऱ्यांनो आनंदात जगा, सुखाने निरोप घ्या…” या दोन पुस्तकांचे प्रकाशन रविवारी दि. ११ रोजी संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव पीपल्स बँकेचे मार्गदर्शक भालचंद्र पाटील, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे, हभप दादा महाराज जोशी, लेवा एज्युकेशनल युनियनचे सचिव व. पु. होले हे होते.
सुरुवातीला देवी सरस्वतीचे पूजन करून मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. प्रस्तावनेतून ऍड. संजय राणे यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करीत, जीवनसार सांगणाऱ्या मार्गदर्शक पुस्तकांचे लेखन महत्वाचे असल्याचे सांगितले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते “भगवतप्रणीत जीवनरेखा (सकल जनांसाठी)” व “म्हाताऱ्यांनो आनंदात जगा, सुखाने निरोप घ्या…” या दोघी पुस्तकांचे प्रकाशन झाले.
लेखक मनोहर राणे यांनी पुस्तक लेखनाविषयी सांगितले. भगवद्गीतेविषयी लिखाण करून आयुष्य सार्थ झाले. तसेच, माझ्या जेष्ठ सहकाऱ्यांना नैराश्याऐवजी सुखात जगण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता सकारात्मक विचारसरणीचे दुसरे पुस्तक त्यांना मदत करेल असेही मनोहर राणे सांगितले.
भालचंद्र पाटील म्हणाले, आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे “म्हाताऱ्यांनो आनंदात जगा, सुखाने निरोप घ्या…” हे लिहिलेले पुस्तक नक्कीच वृद्धाना प्रेरणादायी आहे. तर भगवद्गीतेविषयीचे लिखाण अध्यात्मिक मनःशांतीकरिता उपयुक्त आहे असे ते म्हणाले. डॉ. उल्हास पाटील यांनी लिखाणासाठी सदिच्छा देऊन, लेखकाने शतायुषी होऊन आणखी प्रेरणादायी लिखाण करावे. जेणेकरून समाजाला उपयुक्त होईल, असे सांगितले. सूत्रसंचालन तुषार वाघूळदे यांनी केले तर आभार किरण राणे यांनी मानले.