आईच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवड ; शैक्षणिक साहित्य वाटपाचा केला संकल्प
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील टाकळी खुर्द येथील रहिवासी विकास सोसायटीचे चेअरमन आनंदा संतोष महाजन, अशोक महाजन, रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त इंजिनिअर रंगनाथ महाजन यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई संतोष महाजन ह्या गेल्या २० जुलै रोजी निसर्ग विलिन झाल्या होत्या. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने त्यांचा दशक्रिया आणि गंधमुक्ती विधी विधीकर्ते रमेश वराडे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी परंपरागत कर्मकांडाला पूर्णपणे नाकारून महात्मा फुले निर्मित सत्यशोधक पद्धतीने सर्व विधी करण्यात आला.
सर्वप्रथम कुलदैवत पूजन, महापुरुषांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच आईच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच जि. प. प्राथमिक मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला.
यांच्याकडून मिळाली प्रेरणा
कार्यक्रमासाठी सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे, प्रचारक रमेश वराडे, कैलास महाजन, पवन माळी यांच्याकडून प्रेरणा मिळाली. यावेळी महात्मा फुले बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष आबासाहेब महाजन, रमेश वाघ, कृषीभूषण रवी महाजन, सामाजिक कार्यकर्ते विजय सोनवणे पुंडलिक महाजन, मोहन बावस्कर, कमलाकर तायडे, किशोर रोकडे, दिलीप माळी यांच्यासह नातेवाईक, समाज बांधव उपस्थित होते.