साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील खामखेडा पुलावर एक मोठा पूल आहे. या पुलावरून नेहमी आत्महत्या होत असतात. त्यांना कुठेतरी आळा बसावा, म्हणून आ.चंद्रकांत पाटील यांनी नगरविकास विभागातून येथे जाळी बसविण्याचे काम केले. त्यामुळे सोमवारी, ३ जून रोजी या पुलावरील एक आत्महत्या रोखण्यास खामखेडा येथील शिवसैनिकांना यश आले आहे. आमदारांची दूरदृष्टी आणि शिवसैनिकांच्या सतर्कतेने तरुण करीत असलेली आत्महत्येची दुर्घटना टळली आहे.
दिनेश तायडे (रा. मलकापूर) हा तरुण उचंदा येथील त्याच्या आत्याकडे आलेला होता. परंतु ३ जून २०२४ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान अचानक खामखेडा पुलावरील तारांची जाळीवरच चक्क चढून त्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी येथून जात असलेले खामखेडा येथील पोलीस पाटील किरण गवते तसेच शिवसैनिक अरुण पाटील, किशोर गवते, ईश्वर हटकर, भूषण पाटील, विशाल धनगर, सुरेश पाटील यांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणाला हटकले. त्यास जाळीवरच पकडून ईश्वर हटकर यांनी लागलीच आ.चंद्रकांत पाटील यांना भ्रमणधमीवरून कळविले. त्यानंतर आमदारांनी तात्काळ पोलीस निरीक्षकांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे तात्काळ येथे पोलीस पोहचल्याने तरुणाला त्या जाळीवरून सुरक्षित खाली उतरवून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या कुटुंबियांना याबाबत कळविण्यात आले. दरम्यान, आ.चंद्रकांत पाटील यांच्या दूरदृष्टीने खामखेडा पुलावरील आत्महत्या करण्याच्या घटनेला कुठेतरी पायबंद बसला आहे.