तिघे आरोपी अटकेत, सात दिवसांची सुनावली पोलीस कोठडी
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
येथील माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर गेल्या २६ ऑगस्ट रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शहर पोलीस ठाण्यापासून आरोपींची न्यायालयापर्यंत पायी धिंड काढत रविवारी, ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आता शांतता प्रस्थापित झाली आहे. लोकांच्या मनात तयार झालेली भीतीही आता नष्ट झाली असल्याचे सद्यस्थितीला परिस्थिती आहे.
याप्रकरणी शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी शहरात महिलांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आरोपींच्या शोधत असलेल्या पोलीस पथकांनी रात्रीच तिन्ही आरोपींचा शोध घेत ताब्यात घेतले होते. अटकेतील आरोपींमध्ये सोमा उर्फ सागर चौधरी, सनी उर्फ हरीश आबा चौधरी आणि गौरव चौधरी यांचा समावेश आहे.
कारवाईनंतर नागरिकांमध्ये समाधान
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली केली. आरोपींच्या शोधासाठी तयार केलेल्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्यासह त्यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपींचा शोध घेत अटक केली. कारवाईनंतर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करत आहे.