जामनेरच्या इतिहासात प्रथमच पोलीस स्टेशनवर जमावाकडून हल्ला

0
39

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील चिंचखेडा बु. गावातील अल्पवयीन चिमुकलीवर गेल्या ११ जून रोजी अत्याचार करून तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भील (वय ३५) या आरोपीला गुरुवारी, २० जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथील तापी नदीच्या परिसरातून अटक केली. आरोपीला जामनेरमध्ये घेऊन येणार आल्याची वार्ता शहरासह तालुक्यात पसरल्याने जामनेर पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठा जमाव जमा झाला होता. यावेळी जमावाने शहरातील महामार्ग रोखून रस्त्यांमध्ये टायर जाळून आरोपीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांकडून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला गेला. आरोपी जामनेर येथे नसून तो जळगाव येथे असल्याचे पोलिसांकडून जमावाला सांगण्यात आले. जमावाचे समाधान न झाल्याने त्यांनी आरोपीला ‘आमच्या ताब्यात द्या’, अशी मागणी करत जामनेर पोलीस स्टेशनवर हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या १४ जणांना रात्रीच ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संतप्त जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेकही केली. त्यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दगडफेकीनंतर पोलीस स्टेशन आवारात दगडाचा खच पडलेला दिसून आला. इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा हल्ला जामनेर पोलीस स्टेशनवर केला आहे. या घटनेबद्दल मंत्री गिरीष महाजन यांनी सोशल मीडियावर संवेदना व्यक्त केल्या आहेत. शहरात शांतता प्रस्थापित झाली असून सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु आहेत. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कविता पवार ठाण मांडून आहेत.

सीआरपीएफच्या दोन तुकड्या दाखल

जामनेर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप हे आपल्या टिमसह जामनेरात दाखल झाले होते. तसेच सीआरपीएफच्या दोन तुकड्या शहरात दाखल झाल्या होत्या. दरम्यान, जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. तरीही जमाव शांत होत नव्हता. जमावाच्या दगडफेकीत पोलीस ठाण्याच्या काचा फुटल्या. संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली, अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांच्या दुचाकींचीही तोडफोड करण्यात आली.

मंत्री गिरीष महाजन यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या संवेदना

जामनेर शहरात काल रात्री दिसून आलेला जनतेचा आक्रोश आणि संताप रास्त आहे. कोणत्याही संवेदनशील नागरिकाचा संताप अनावर व्हावा असेच कुकृत्य संबंधित नराधमाने केले आहे. अशा दुर्दैवी घटनेमुळे मीही आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित झालो आहे. पण माझी सर्वांना नम्र विनंती आहे की, कृपया भावनांना आवर घालावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये. तपास यंत्रणेला त्यांचे काम करू द्यावे. दोषी व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, या दृष्टीने काटेकोर तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. संकटग्रस्त परिवाराला आवश्‍यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्याचीही सूचना मी प्रशासनाला केली आहे, अशा सोशल मीडियावर ना. गिरीष महाजन यांनी संवेदना व्यक्त केल्या.

नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवावे. त्यामुळे नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कविता पवार यांनी केले आहे.

१४ संशयित आरोपी ताब्यात

जामनेर पोलीस स्टेशनवरील हल्ला प्रकरणी १४ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरितांचा शोध सुरु आहे. तसेच पोलीस स्टेशनवर झालेल्या हल्ल्यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह रमेश कुमावत, रामदास कुंभार, संजय खंडारे, सुनील राठोड, प्रितम बरकले, हितेश महाजन, मुकुंदा पाटील, संजय राखुंडे असे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here