साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
खान्देशातील महत्वाचा मुख्य सण म्हणून ओळखला जाणारा “रोट म्हणजे” कानबाईचा उत्सव पाडळसरे येथे साजरा करण्यात आला. सलग तीन दिवस गावात कामानिमित्त बाहेरगावी, परराज्यात गेलेले भाऊबंदकीतील लोक परिवारासह गावात दाखल झाले होते. त्यामुळे गावात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. कानबाईची सवाद्य मिरवणूक काढून गावभर पूजन, ‘हंगाम चांगला येऊ दे…’ म्हणत कानबाईचे तापीत विसर्जन करण्यात आले.
गेल्या पंधरा दिवसांपासून कानबाईच्या उत्सवासाठी महिला वर्ग साफसफाईच्या कामात व्यस्त होत्या. गावात भरपूर वर्षे झाली अडीअडचणीमुळे बंद केलेला कानबाईचा उत्सव यावर्षी साजरा करण्यात आला. त्यासाठी सर्व समावेशक परामर्श करून पूर्वापार चालत आलेली परंपरा कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन तरुण पिढीला आदर्शवत असलेल्या व नवविवाहित दाम्पत्याला कुलाचार धर्म पाळून करावयाची पूजा विधी लक्षात रहावी, यासाठी राजेंद्र दत्तात्रय पाटील, भरत रोहिदास पाटील, विजय राजाराम पाटील यांच्या कुटुंबियांनी आपल्या घरी शनिवारी विधीवत कानबाईची स्थापना केली होती. ग्रामदैवत मरीआईच्या मंदिरात कुटुंबातील कर्त्या महिलांच्या मार्गदर्शनाने नैवेद्य दाखवून रोट पूजनाने सुरुवात केली. यासाठी तीन दिवस महिला व नागरिकांकडून लगबग दिसून आली. त्यात रविवारी दुपारी कानबाई मातेची कौटुंबिक जोडप्याच्या मदतीने विधीवत पूजा करून झाल्यावर जोडपीच्या जोडपी कानबाईच्या पुजनासाठी रांगा लावून दर्शन घेत निघत होत्या.
कानबाईच्या गाण्यावर ग्रामस्थ बेभान नाचले
कानबाईचे वही गायन, भारुड, भजन व गायनाचा कार्यक्रम, फुगडी, पिंगा खेळत महिला व पुरुषांच्या बरोबरीने कानबाईचा जागर केला. रात्रभर होऊन कानबाईजवळ प्रत्येक भाऊबंदकीतील महिला व पुरुषांनी गाऊन संगीत तालावर नाचगाणे करून जागरण केले. सोमवारी सकाळीच ८ वाजेपासून कानबाईच्या विसर्जन तयारीची लगबग दिसत होती. महिला व मुलींनी आपापला खान्देशी पारंपरिक वेषात कानबाईचे जोडप्यांनी पूजन करून विजय पाटील यांच्या घरापासून कानबाई मातेची पहिल्या स्थापनेपासून प्रसाद वाहुन सवाद्य विसर्जन मिरवणूकीस सुरूवात केली. सवाद्य मिरवणुकीत पारंपरिक वाद्य, डीजे, संबळ वाद्य वाजवत दुसरी कानबाई राजेंद्र पाटील यांच्या घरून सुवासिन महिलेच्या डोक्यावर घेऊन सर्व नागरिक व महिलांच्या सहभागने मिरवणूक तिसरी कानबाई माय भरत पाटील यांच्या घरी जाऊन पूजा करून मिरवणुकीत सामील झाले. गावातील घराघरातून सुवासिनींनी कानबाईचे पूजन केले. चौकाचौकात डीजे व ढोल ताश्याच्या गजरात ग्रामस्थ कानबाईच्या गाण्यावर व संगीताच्या तालावर बेभान होऊन नाचत होते.
महिला वर्ग झाल्या भावविवश
पुनर्वसन गावातील मिरवणूक जवळपास पाच तास चालली. जुन्या पाडळसरे गावात गेल्यावर ग्रामदैवत अंबिका मातेच्या मंदिरात गावातील सर्व कानबाईचे एकत्रित सामूहिक पूजन व आरती झाली. त्यानंतर पुन्हा जुन्या गावभर मिरवणूक तापी नदी काठावरील नाटेश्वर महादेवासमोर कानबाईला विश्रांती दिली. तसेच नदी तीरावर उपस्थित सर्व ग्रामस्थांनी आरती करून तापी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात कानबाईमातेला तापी तीर्थ दाखवून मोठ्या मनाने “कानबाई माता की जय” म्हणत कानबाईचे विसर्जन केले. यावेळी महिला वर्ग भावविवश झालेल्या दिसून आल्या.



