‘Navratri Festival’: तरुण पिढीचा फेव्हरेट फेस्टिव्हल ‘नवरात्रौत्सव’

0
25

उत्सवात ऊर्जा, शिस्त, सामाजिक भान अन्‌ आधुनिकतेची दिसणार झलक

‘नवरात्री’ हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. नऊ दिवसांचा हा उत्सव ‘नऊ रात्री’ या शब्दावरून नवरात्री म्हणून ओळखला जातो. या काळात आदिशक्तीची उपासना केली जाते. देवीच्या नऊ रूपांची पूजा करून तिच्या शक्ती, करुणा आणि मातृत्वाचा सन्मान केला जातो. नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा देवीच्या एका रूपाला अर्पण केलेला असतो. शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंतच्या नऊ स्वरूपांमध्ये देवीचे सामर्थ्य, ज्ञान, करुणा, पराक्रम आणि अध्यात्मिक शक्तीचे दर्शन घडते. भक्त उपवास, जागरण, गरबा-दांडीया आणि आरत्या करून अशा उपासनेत सहभागी होतात. यंदा शारदीय नवरात्र उत्सवाला येत्या सोमवारी, २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. अशा उत्सवासाठी आजची तरुणाई सज्ज झाली आहे. त्यासाठी नवरात्रीतील तरुणाई आणि नवरात्रीविषयाचे महत्त्व जाणून घेणारा लेख दै. ‘साईमत’च्या वाचकांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल.

नऊ दिवसांची भक्ती अविरत,
नऊ रूपांची आराधना सतत,
नवरात्रीत उमटतो उत्साह नवा,
शक्तीचा संदेश देतो दर दिवस सदा

ग्रामीण भागात नवरात्रीत देवीचे गोंधळ, भंडारे आणि यात्रांचे आयोजन केले जाते. शहरी भागात गरबा, दांडीया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. गुजरातमधील गरब्याला जागतिक प्रसिद्धी आहे. महाराष्ट्रात देवीच्या मंडपात भजन, कीर्तन आणि सामूहिक पूजा होतात. परंपरा आधुनिकतेशी जुळवून घेताना उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. नवरात्री फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमांसाठी प्रेरणा देणारा उत्सवही ठरत आहे.

गरबा-दांडीयाच्या तालावर नृत्य खुलते,
आरतीच्या गजराने हृदय उजळते
शक्तीच्या उपासनेतून उमलतो उत्साह,
नवरात्री सणात भिनतो आनंद अथांग

नवरात्री हा सण केवळ धार्मिक उपासना नसून सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. या काळात स्त्रीशक्तीचे महत्व अधोरेखित केले जाते. देवी ही केवळ भक्तीची आराध्य नव्हे तर स्त्रीचे सामर्थ्य, त्याग आणि मातृत्व यांचे प्रतीक आहे.आजच्या काळात नवरात्री हा केवळ मंदिरे आणि मंडपांपुरता मर्यादित राहिलेला नाही. सोशल मीडियावरही भक्तीगीतं, डिजिटल आरत्या आणि लाईव्ह पूजांचे प्रक्षेपण होत असते. तरुणाई पारंपरिक पोशाख घालून दांडीया खेळते. त्यामुळे उत्सवाला आधुनिकतेचा नवा साज चढतो.

अध्यात्माची साधना, आनंदाचा रंग,
नवरात्री घडवते जीवन नवं उमंग,
स्त्रीशक्तीच्या जयघोषात भरते नाद,
भक्तिभावाने सजतो नवलाईचा सण

नवरात्री हा सण शक्तीची उपासना, भक्तीची साधना आणि आनंदाचा सोहळा आहे. त्यातून आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करून केवळ धार्मिक आनंद घेत नाही तर समाजात स्त्रीशक्ती, संस्कृती आणि ऐक्याचा संदेशही देतो. परंपरेतून आधुनिकतेकडे वाटचाल करताना हा उत्सव प्रत्येकाला प्रेरणा देतो. अंधारावर प्रकाशाचा, दुष्टावर सज्जनतेचा आणि दुर्बलतेवर शक्तीचा विजय मिळवण्यासाठी.

भक्तिभावाचा साज, रंगतो दररोज,
नऊ रूपांची पूजा, उमलतो उत्साह ओज,
शक्तीची साधना, श्रद्धेची ज्योत,
नवरात्री देते जीवनाला नवा प्रकाश झोत

नवरात्री म्हणजे नऊ रात्रींचा उत्सव. या दिवसात आदिशक्तीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. त्यात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या देवीच्या रूपांना भक्त अर्पण करतात. हिंदू धर्मशास्त्रांनुसार, नऊ दिवसात देवीने असुरांवर विजय मिळवून धर्म, न्याय आणि सत्याचे रक्षण केले. म्हणूनच नवरात्री हा सज्जनतेचा दुष्टावर विजयाचे प्रतीक मानला जातो. ग्रामीण भागात नवरात्रीचे रंग अधिकच वेगळे दिसतात. गावोगावी देवीच्या मंदिरात गोंधळ, कीर्तन आणि भंडाऱ्यांचे आयोजन केले जाते. मंडपात ग्रामस्थ सामूहिक पूजा करतात. महाराष्ट्रात विशेषतः घटस्थापना हा विधी मोठ्या श्रद्धेने केला जातो. देवीसमोर नवरात्रीत अखंड नंदादीप प्रज्वलित ठेवला जातो. पारंपरिक पोशाख घालून तरुणाई रात्री उशिरापर्यंत दांडीयाचा आनंद घेतात.

घटस्थापनेतून उमलते श्रद्धेचे बीज,
आरतीतून मिळते शांततेची लय,
दांडीयाच्या तालावर नाचते तरुणाई,
नवरात्रीत घुमते आनंदाची हाक सई

गावागावात सामूहिक आरत्या, कीर्तन व भजन यामुळे लोक एकत्र येतात. हा सण स्त्रीशक्तीचा गौरव करणारा आहे. देवी ही केवळ पूजनीय देवता नाही तर ती स्त्रीचे धैर्य, त्याग, मातृत्व व सामर्थ्य यांचे प्रतीक आहे. जामनेर तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थिनींनी नवरात्रीत “मुलगी शिकली – प्रगती झाली” या घोषवाक्यासह स्त्रीशक्ती जनजागृती रॅली काढली. त्यांनी देवीची आराधना करताना समाजाला स्त्रीशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. हा उपक्रम नवरात्रीला सामाजिक भान देणारा ठरला.

डिजिटल युगात नवरात्रीचा उत्सव नव्या पद्धतीने अनुभवायला मिळतो. यूट्यूब, सोशल मीडिया आणि लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे लाखो भक्त देवीच्या आरत्या घर बसल्या पाहतात. ऑनलाईन गरबा-दांडीयाचेही आयोजन होऊ लागले आहे.तरीही, पारंपरिक श्रद्धा आजही कायम आहे. लोक देवीच्या मूर्तीसमोर नैवेद्य ठेवतात, व्रत करतात आणि मनोभावे आरती करतात. आधुनिकतेसोबत परंपरेची सांगड घालणारा हा सण समाजाला सांस्कृतिक वारसा जपण्याची प्रेरणा देतो.

तंत्रज्ञानाची साथ, परंपरेची ओढ,
नवरात्रीत जुळतो नव्या-जुन्याचा बंध,
डिजिटल आरत्या, पण श्रद्धा तीच,
भक्तिभावाने उजळतो प्रत्येक नीज

नवरात्री ही केवळ पूजा नाही तर कला-संस्कृतीचा उत्सव आहे. लोककला, नृत्य, संगीत, भजन-कीर्तन यातून भारतीय संस्कृतीची विविधता जाणवते. गरबा-दांडीयाच्या तालांमध्ये तरुणाई ऊर्जा शोधते तर आरतीच्या गजरात वृद्धांना अध्यात्माचा साक्षात्कार होतो. हा सण प्रत्येकाला आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचा स्वीकार करण्याची प्रेरणा देतो.

शक्तीची उपासना, भक्तीची साधना,
नवरात्रीत होते मनशांतीची आराधना,
नऊ दिवसांचा हा सोहळा पवित्र,
आयुष्याला देतो नवा उत्साह अमृत

नवरात्री हा भारतीय संस्कृतीचा दीपस्तंभ आहे. त्यातून आपल्याला धर्म, अध्यात्म, कला, संस्कृती, समाज व स्त्रीशक्तीचे दर्शन घडते. नवरात्री हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर एक समाजजागृती, संस्कृतीची उजळणी आणि आनंदाचा सोहळा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात नवरात्री आपल्याला क्षणभर थांबून अंतर्मनाशी संवाद साधण्याची आणि शक्तीची उपासना करून सकारात्मकतेचा स्वीकार करण्याची शिकवण देते. म्हणूनच नवरात्री हा खऱ्या अर्थाने शक्तीचा उत्सव आणि भक्तीचा महापर्व आहे. त्यामुळेच आजच्या तरुण पिढीचा फेव्हरेट फेस्टिव्हल म्हणून ‘नवरात्रौत्सव’ ठरत आहे.

तरुणाईच्या सहभागामुळे नवरात्रीला नवी उभारी

नवरात्री हा सण आज फक्त देवीच्या उपासनेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो तरुणाईच्या उत्साहाचा, सर्जनशीलतेचा आणि समाजाला दिशा देणारा मोठा सोहळा ठरला आहे. पूर्वी नवरात्री म्हटले की भजन, कीर्तन, देवीची आरती एवढ्यापुरतेच मर्यादित स्वरूप होते. पण आता तरुणाईने त्यात आधुनिकतेचा आणि आकर्षकतेचा संगम घडवून आणला आहे. रंगीबेरंगी सजावट, गरबा-दांडीया, विविध सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे नवरात्रीला नवा चेहरा मिळाला आहे. सोशल मीडियाच्या युगात युवक-युवती नवरात्रीतील क्षण जागतिक पातळीवर पोहोचवत आहेत. विविध उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक संदेशही दिला जातो. देवीच्या पूजेबरोबरच तरुणाई स्त्रीशक्तीच्या गौरवाची जाणीव ठेवते. त्यामुळेच “बेटी बचाओ, बेटी पढाओ”, महिला सक्षमीकरण, पर्यावरणपूरक उत्सव असे उपक्रम नवरात्रीनिमित्त जोर धरू लागले आहेत. तरुणाईच्या सहभागामुळे नवरात्रीला नवी उभारी मिळत आहे.

तरुणाईची धमाल… नवरात्रीची कमाल…!

ग्रामीण भागात जागर, भजन, गोंधळ तर शहरी भागात दांडीया आणि गरबा अशा कार्यक्रमात तरुणाईची प्रचंड गर्दी दिसते. जात, धर्म, भाषा, प्रांत या भेदांना विसरून युवक-युवती नवरात्रीत एकाच धाग्यात बांधले जातात. काही ठिकाणी रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहिमा अशा सामाजिक उपक्रमांचीही रेलचेल असते. नवरात्रीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. पारंपरिक पोशाख, अलंकार, डिझाईनर वस्त्रांपासून ते सजावटीच्या साहित्यापर्यंत सर्व गोष्टींना मागणी वाढते. त्यामुळे स्थानिक कारागीर, व्यापारी, डिझायनर यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे झाले तर नवरात्री हा सण आता फक्त धार्मिक राहिलेला नाही तर तो सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीचा महोत्सव बनला आहे. युवक-युवतींच्या सहभागामुळे अशा उत्सवात ऊर्जा, शिस्त, सामाजिक भान आणि आधुनिकतेची झलक दिसते. म्हणूनच आज नवरात्री हा तरुणाईचा सांस्कृतिक उत्सव ठरला आहे. त्यामुळेच आता ‘तरुणाईची धमाल… नवरात्रीची कमाल…!’ असे म्हणावे लागेल, एवढेच.

– शरद भालेराव
उपसंपादक,
दै. ‘साईमत’, जळगाव.
मो.क्र.८८३०४१७७३६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here