बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासण्याचा घडला प्रकार

0
15

फैजपूर, ता. यावल : वार्ताहर

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासण्याचा भयंकर प्रकार तालुक्यातील न्हावी गावानजीक उघडकीस आला आहे. यावल तालुक्यातील न्हावी शिवारातील एका शेतात पोटच्या पाच वर्षीय चिमुकलीला विहिरीत ढकलून देत तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यात नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अनिता ठूशा बारेला (वय ५, रा. न्हावी ता.यावल) असे मयत चिमुकलीचे नाव आहे.

सविस्तर असे की, ठुश्या भावला बारेला (वय ३०, रा. गुलझीरी ता.झिरण्या, जि. खरगोन, मध्य प्रदेश) हा सध्या यावल तालुक्यातील न्हावी शिवारातील सुनील नामदेव फिरके यांच्या शेतात वास्तव्याला आहे. त्यांची पाच वर्षाची चिमुकली कन्या अनिता बारेला ही नेहमी आजारी राहत असल्याने तिच्या घरच्यांनी तिला दवाखान्यात नेण्याचे ठुश्या बारेला याला सांगितले होते. दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता संशयित आरोपी ठुश्या बारेला याने मुलगी अनिता बारेला हिला दवाखान्यात घेऊन जात असल्याचे सांगून सोबत नेलेे. त्यानंतर न्हावी शिवारातील धीरज सुधाकर चौधरी यांच्या शेतातील विहिरीत ढकलून जीवे ठार मारले.

ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांपूर्वी चिमुकलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी चौकशी केल्यावर मयत चिमुकलीचे वडील संशयित आरोपी ठुश्या बारेला यानेच तिला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात संशयित आरोपी ठूश्या बारेला याला पोलिसांनी अटक केली आहे. मयत चिमुकलीची आजी छंडा वारला बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ठुश्या भावला बारेला याच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here