साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध व प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाच्यावतीने गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी नेत्यांचा आक्रोश मोर्चात सहभाग
याप्रसंगी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री सतिष पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जळगाव महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील यांच्यासह शरद पवार गटाचे अनेक आजी-माजी नेत्यांनी सहभाग घेतला होता.
आ.जयंत पाटलांच्या हातात ट्रॅक्टरची स्टेरींग
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चाला सुरूवात करण्यात आली. यावेळी जयंत पाटील यांनी स्वत: ट्रॅक्टरवर बसून स्टेरींग हातात धरल्याचे पहायला मिळाले. यावेळी जिल्ह्याभरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. यावेळी महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग असल्याचे दिसून आले. त्यांच्या पाठोपाठ महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनीही ट्रॅक्टरची धुरा सांभाळत आक्रोश मोर्चात सहभाग नोंदविला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा आक्रोश मोर्चात समावेश
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने नुकसानी भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी, कापूस उत्पादकांना हमी भाव देण्यात यावा किंवा बाजारभावासह प्रति क्विंटल ५ हजार रूपये अनुदान देण्यात यावे यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी शरद पवार गटाच्यावतीने गुरूवारी, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून सुरूवात करण्यात आला. यावेळी ट्रॅक्टर आणि बैलगाडीवर स्वार होऊन शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याचे पहायला मिळाले. मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती, अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक आणि त्यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.