लोंबकळलेल्या विजेच्या तारांनी घेतला शेतकऱ्याचा जीव

0
376

साईमत/ न्यूज नेटवर्क/ पहुर, ता. जामनेर :

कपाशीच्या शेतात कोळपणी करण्यासाठी जात असताना लोंबकळलेल्या विजेच्या तारांना कोळप्याच्या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील दोंदवाडे येथे एकुलती शिवारात शनिवारी, २० जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर असे की, सध्या सर्वत्र शेती कामांना वेग आला आहे. दोंदवाडे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा प्रगतिशील शेतकरी शिवाजी गरबड पाटील ( वय ५५) हे त्यांच्या कपाशीच्या शेतात कोळपणी करण्यासाठी जात होते. त्यांनी कोळपे खांद्यावर घेऊन शेतात प्रवेश करताच लोंबकळलेल्या वीजतारांना त्यांच्या खांद्यावरील कोळप्याच्या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. विजेच्या धक्क्यामुळे त्यांनी जोरात किंकाळी मारुन ते खाली कोसळले. त्यांच्या आवाजाने त्यांचा मजूर पावरा धावत आला. त्याने आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले. त्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ . संदीप पाटील यांनी उपचाराअंती त्यांना मयत घोषित केले. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

पहुर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, पोलीस पाटील नितीन परदेशी यांच्यासह दोंदवाडे, एकुलती, पहूर येथील ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ .संदीप पाटील यांच्या खबरीवरून पहुर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील करीत आहेत.

महावितरणचे दुर्लक्ष

वीज महावितरण कंपनीचे शेत शिवारातील वीजतारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वर्षानुवर्षे जीर्ण झालेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारा शेतकऱ्यांच्या जिवाशीच क्रुर खेळ खेळत आहे.वीजतारा सुव्यवस्थित करण्याची तसेच निष्पाप मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

एकुलती, दोंदवाडे परिसरावर पसरली शोककळा

प्रगतीशील शेतकरी शिवाजी पाटील हे हसतमुख आणि सर्वांच्या हाकेला साद देणारे कष्टकरी होते. ज्या शेतात आयुष्यभर कष्ट उपसले. त्याच शेतात विजेच्या धक्क्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी लौकिकास्पद कार्य केले. त्यांच्या पत्नी सिंधुबाई पाटील यांनीही दहा वर्षे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून पद भूषविले. शेतकरी शिवाजी पाटील यांच्या अकाली निधनाने एकुलती, दोंदवाडे परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शनिवारी, रात्री ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here