Mother And Daughter : कौटुंबिक वादाने नेले माय-लेकीचे ‘जीव’

0
19

छोट्या मुलीसह मातेची आत्महत्या; भादली रेल्वे पुलाजवळील हृदयद्रावक घटना

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

तालुक्यातील नशिराबाद येथील एका विवाहितेने कौटुंबिक वादातून आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. त्यामुळे कौटुंबिक वादाने दोन ‘जीव’ गेल्याचा सूर जनसामान्यांमधून उमटत आहे. २२ सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या अशा घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, ही धक्कादायक घटना तालुक्यातील भादली रेल्वे पुलाजवळ घडली. मृतांमध्ये मनीषा चंद्रकांत कावळे (वय २८) आणि त्यांची मुलगी गौरी चंद्रकांत कावळे (वय ६) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील नशिराबाद येथील भवानी नगरात पती चंद्रकांत, दोन मुलींसह मनीषा राहत होत्या. चंद्रकांत हे एमआयडीसीतील एका चटई कंपनीत काम करतात. सोमवारी दुपारच्या सुमारास मनीषा यांनी रेशनचा तांदूळ आणण्याचे कारण सांगून लहान मुलगी गौरीला सोबत घेत घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या परतल्या नसल्याचे सांगण्यात आले.

एका महिलेने मुलीसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती सायंकाळी उशिरा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल रूपेश साळवे यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची ओळख पटवली. तेव्हा ती मनीषा आणि गौरी असल्याचे स्पष्ट झाले. घटनेनंतर कावळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासात पारिवारिक वाद हेच आत्महत्येमागचे कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here