राज्य शिक्षण मंडळाचे अस्तित्व कायम; दादा भुसे यांची ग्वाही
नाशिक (प्रतिनिधी)–
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांत आगामी शैक्षणिक वर्षापासून केवळ इयत्ता पहिलीसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. बालभारती आणि राज्य माध्यमिक शालेय प्रमाणपत्र मंडळाचे अस्तित्व कायम राहील, अशी ग्वाही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी येथे दिली.
सीबीएसई अभ्यासक्रमाविषयी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमधील गैरसमज सभागृहात आणि पत्रकार परिषदेत दूर केले जाणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. काहींना बालभारती आणि राज्य माध्यमिक शालेय प्रमाणपत्र मंडळाच्या (एसएससी बोर्ड) अस्तित्वाविषयी संभ्रम वाटतो. परंतु, त्यांचे अस्तित्व कायम राहणार आहे. माहिती मांडल्यानंतर सर्वांचे गैरसमज दूर होऊन या निर्णयाचे स्वागत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षक भरतीची दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषदेसह अन्य संस्थांकडून बिंदू नामावली, कागदपत्र पूर्ततेला वेळ लागत असल्याने मुदतवाढ देण्यात आली. आठ दिवसात भरती सुरू होईल, असेही भुसे यांनी नमूद केले.



