साईमत जळगाव प्रतिनिधी
‘ठाणांग सूत्र’ आगम मध्ये संपूर्ण जीवनाचा सार आलेला आहे. आपण वाचन संस्कार जपले पाहिजे, असे आवाहन आचार्यभगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी केले.
‘संपर्क’, ‘सहवास’, ‘सान्निध्य’ आणि ‘संबंध,’ ‘प्रेम’, ‘प्रेरणा,’ आणि ‘प्रोत्साहन’ संकल्पना ‘ठाणांग सूत्र’ आगम वाचना शिबीरात सरस्वती लब्धप्रसाद, विपुल साहित्य सर्जक, पद्मभूषण पूज्यपाद आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी अत्यंत सोप्या भाषेत श्रावक – श्राविकांना समजावून सांगितल्या. जैन हिल्स स्थित आकाश प्रांगण येथील ‘हिरा संस्कार छत्र’ येथे जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ शिबीराचा दुसरा दिवस होता. या कार्यक्रमाचे सेवार्थी भवरलाल आणि कांताबाई जैन परिवार आहे. या सहाव्या शिबिरात गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यासह विविध प्रांतातील चारशेहून अधिक श्रावक-श्राविकांचा सहभाग आहे.
सकाळ सत्रात संयम बहुल, संवर बहुल आणि समाधी बहुल या विषयावर विवेचन केले. एखाद्या गोष्टीवर अमल करायचाच नसेल तर न करण्याचे हजार बहाणे असतात. हे आपल्याला करायचेच असा पक्का संकल्प असेल तर कितीही अडचणी आल्या तरी ते पूर्ण करण्याशिवाय राहत नाही. त्यासाठी हरिभद्र सुरीश्वरजी महाराजांची त्रिसुत्री उपस्थितांना सांगितली. उत्तम कार्य करायचे असेल तर ते दीर्घकाळ करावे, निरंतर सातत्याने करावे तिसरी गोष्ट म्हणजे निष्ठेने करावे हा मोलाचा संदेश महाराज साहेबांनी दिला.
दुसऱ्या सत्रात आगम वाचना विशेष असून जे उत्तम विचार आचारणाचे प्रेरणास्थान असल्याचे विवेचन केले. संतानी सांगितलेल्या साधनेच्या मार्गावर चालणे म्हणजे साधक होय. कठिण परिस्थितीतही भूमिका मजबूत असावी ती कमजोर झाली तर पापांवर नियंत्रण मिळविण्याच्या क्रियेला स्पिडब्रेकर लागल्याशिवाय राहत नाही. परमेश्वराला सुखाचा विरोध आहे तर आनंद स्वरूप सुखाची अपेक्षा आहे त्यात स्वाधिन म्हणजे आनंद पराधिन म्हणजे सूख तर आत्मसंचित म्हणजे आनंद स्वरूप होय. अंतर्यामी, अंत:करण, अंर्तमूख होऊन कुठल्याही कार्यात धर्माची आठवण ठेवली पाहिजे. शिक्षणाचा चांगला सदुपयोग केला तरच आपण खरे विद्यार्थी, धनाचा विनयशिलतेने उपयोग केला तर आपण खरे व्यापारी, मुनींनी दिलेल्या धर्मउपदेशानुसार राग, द्वेष, स्वाद, लोभ दूर ठेवून सदाचरणी बना असा संदेश परमपूज्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी दिला.
‘श्रुत संजीवन’ जैन आगम आधारीत पुस्तकाचे विमोचन
आचार्य पद्म सुरीश्वर म. सा. यांनी दुर्मिळ जैन ग्रंथ लिपीबध्द केले आहे. गुरुदेव यांच्या शिष्य परिवाराने श्रुतसंजीवन पुस्तकाचे निर्माण केले. या पहिल्या अंकाची निर्मिती धुळे संघाने केलेली आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, संदीप भाई, मनोज भाई (सौदी अरेबिया), श्रेयस कुमट, नितीन चोपडा, अमित कोठारी, केतन भाई यांच्याहस्ते ‘श्रुत संजीवन’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.