चार ते पाच गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता, सा.बां.उपविभागाला सांगूनही काम होईना!
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील सातोड गावा जवळील एका पुलावरील वाळूचा भराव संततधार पावसामुळे वाहून गेल्याने याठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. नागरिकांनी मुक्ताईनगर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करूनही डागडुगी होत नसल्याचा आरोप केला आहे.
मुक्ताईनगरपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील सातोड गावाजवळील पूल पावसाच्या पाण्याने मागील दोन ते तीन वर्षांपासून भराव वाहून जात असतो.पूल हा दोन तालुक्याला तसेच चार ते पाच गाव जोडणारा आहे. वारंवार त्याची माहिती मुक्ताईनगर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाला तसेच सोशल मीडियाद्वारे करूनही लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी घटनेकडे दुर्लक्ष करतात.
अनेकांना करावा लागतोय जीव धोक्यात घालून प्रवास
गावातील नागरिक तसेच त्या रस्त्याने जाणारे नागरिक, शाळकरी विद्यार्थी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करतात. त्यासंदर्भात शुक्रवारी मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाला पत्र देण्यात आले आहे. यावेळी दीपक साळुंके, सातोडचे पोलीस पाटील विनोद पाटील, रुईखेडा येथील बाबुराव पाटील, नंदलाल पाटील, सतीश पाटील, अजय कोळी, पुरुषोत्तम घटे, जीवन डहाके, ज्ञानेश्वर पाटील, शुभम न्हावी, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.