१५ जानेवारीला मतदान, दुसऱ्या दिवशी निकाल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव, धुळे महानगरपालिकेसह राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज दुपारी जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी एक महिन्याने म्हणजेच १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी सोमवारी, १५ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील २९ महापालिकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार आहेत. जळगाव महापालिका मतदानाचा कार्यक्रम असा- अर्ज भरण्यास सुरुवात : २३ ते ३० डिसेंबर २०२५ , छाननी ३१ डिसेंबर २०२५, अर्ज माघारी २ जानेवारी २०२६, चिन्ह वाटप ३ जानेवारी २०२६, मतदान : १५ जानेवारी २०२६, मतमोजणी १६ जानेवारी २०२६ असा राहील.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला २ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. २७ महापालिकांची मुदत संपली आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
महापालिका निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित २८ महापालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे.
