सुधर्मा संस्थेतर्फे २६ महिलांना किराणासह फराळाचे वाटप
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
समाजातील उपेक्षित, गरजू आणि श्रमिक घटकांसाठी कार्य करणाऱ्या ‘सुधर्मा ज्ञाननसभा’ संस्थेने यंदा दिवाळी सण साजरा करण्याचा अनोखा उपक्रम राबविला. शहरातील तांबापुरा, मेहरुण आणि मन्यारखेडा भागातील एकूण २६ कचरावेचक महिलांना किराणा साहित्य आणि दिवाळी फराळाचे वाटप करून महिलांची दिवाळी गोड केली. छोटेखानी पण हृदयस्पर्शी असा कार्यक्रम “भाऊंचे उद्यान” येथे नुकताच पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे त्यांच्या सोबत सुरेश सूर्यवंशी, संग्राम सूर्यवंशी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ‘सुधर्मा’चे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी भगवद्गीता देऊन केले. सुधर्माचे कार्य गीता आणि ईश्वराच्या आशीर्वादानेच चालते. गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
“मी स्वतः एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो आहे. मेहनत आणि अभ्यासाच्या बळावर हे पद मिळवले. ‘सुधर्मा’ संस्थेद्वारे समाजासाठी होत असलेले कार्य पाहून मला खूप आनंद झाला. आज अशा अर्थपूर्ण आणि संवेदनशील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला अभिमान वाटतो, असे नितीन गणापुरे यांनी सांगितले. उपक्रमात महिलांना तेल, साखर, तूरडाळ, रवा, शेंगदाणे, बेसन यांसारखे आवश्यक किराणा साहित्य तसेच चिवडा, लाडू आदी दिवाळीचा फराळ देण्यात आला. महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद पाहून सर्व उपस्थितांचे मन भरून आले.
कार्यक्रमादरम्यान सुधर्माचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांचा सन्मान करण्यात आला. त्यात नितीन तायडे (समतानगर), भाग्यश्री नन्नवरे (खेडी), सुवर्णा मराठे (मन्यारखेडा) अशा तीन स्वयंसेवकांचा सत्कार करून त्यांच्या समाजसेवेचा गौरव करण्यात आला. ‘सुधर्मा ज्ञाननसभे’च्या संवेदनशील उपक्रमामुळे जळगावातील कचरावेचक महिलांची दिवाळी केवळ उजळलीच नाही तर “गोड” झाली. समाजातील वंचित घटकांसाठी अशा उपक्रमांमुळे खरी दिवाळी उजळते, हेच अशा स्तुत्य कार्यक्रमाने दाखवून दिले.
आजीच्या डोळ्यातून तराळले आनंदाश्रू…!
जामनेर तालुक्यातील वाकोदच्या रहिवासी यमुना गोसावी ह्या आजीची आणि हेमंत बेलसरे यांची भेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाली होती. त्यांची दोन तरुण मुले गेलेली. त्यामुळे उदरनिर्वाह होत नसल्याने भिक्षा मागते, असे आजीने सांगितले. त्यामुळे त्यांनाही किराणा मिळाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तराळले होते.



