संविधानाची खोली समुद्रापेक्षा खोल एवढे भारतीय संविधान महान : ॲड.साहेबराव मोरे

0
46

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

संविधानाची खोली समुद्रापेक्षा खोल आहे. एवढे महान भारतीय संविधान आहे. त्यामुळे संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने राहण्याचा अधिकार दिला असल्याचे प्रतिपादन विधीतज्ज्ञ ॲड. साहेबराव मोरे यांनी केले. लीगल फायटर फाउंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी रिपाइंचे ज्येष्ठ नेते सु.मा.शिंदे, पिरिपाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे, ठाणेदार विलास पाटील, रिपाइं आठवले गटाचे विदर्भ उपाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, ‘समतेचे निळे वादळ’चे जिल्हाध्यक्ष ॲड. कुणाल वानखेडे, ॲड.जी. डी. पाटील, राहुल तायडे, ॲड. नितीन जाधव, ॲड.रवींद्र निकम, ॲड.सुनील मराठे, सय्यद आहेर, ॲड. विशाल इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘समतेचे निळे वादळ’चे संस्थापक-अध्यक्ष अशांत वानखेडे म्हणाले की, भारतीय संविधान हे इतर देशांपेक्षा सर्वश्रेष्ठ असे भारतीय संविधान तळागळातील व्यक्तींना जीवन जगण्याचा मानसन्मानाने राहण्याचा विचार करण्याचा अधिकार आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाने दिलेला आहे. संविधान दिन हा २६ नोव्हेंबरला नव्हे तर प्रत्येक दिनी साजरा व्हायला पाहिजे. प्रत्येक जाती-धर्मातील मानवतेला संविधानाचे मूलभूत अधिकार दिले आहे, हे प्रत्येक भारतीय नागरिकांनी समजून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी लीगल फायटर फाउंडेशनच्यावतीने ‘संविधान रक्षक’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात दैनिक ‘साईमत’चे पत्रकार सतीश दांडगे, ‘समतेचे निळे वादळ’चे संस्थापक-अध्यक्ष अशांत वानखेडे, ठाणेदार विलास पाटील, पत्रकार हनुमान जगताप, एपीआय उमाळे, रिपाइंचे ज्येष्ठ नेते सु.मा.शिंदे, सचिन तायडे, सरपंच पती वाघुळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वप्रथम मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथून संविधानाविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी सध्या न्यायालयाने दिलेल्या निकालाचे फलक मुख्य मार्गाने लावण्यात आले होते. संविधान रक्षक रॅलीत भारतीय संविधानाची प्रस्तावना घेऊन डॉ. बाबासाहेबांच्या जयघोषाने संविधान रक्षक रॅलीची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली. यावेळी सुपडा ब्राह्मणे यांच्या करुणा मित्र मंडळ, वाघुळ येथील मुलींचे लेझीम पथक आकर्षण ठरले.

प्रास्ताविकात लीगल फायटर फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲड. स्नेहल तायडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन लीगल फायटर फाउंडेशनचे ॲड. देवानंद वानखेडे तर आभार सनी मगरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here