साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
हरीभक्त परायण, समाजमनातील श्री समर्थ सद्गुरु सुखदेव महाराज (जळगावकर) यांचे गुरुवारी, २३ ऑक्टोबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महाराजांच्या अंत्ययात्रेस जनसागर उसळला होता. दुपारी ३ वाजता निघालेल्या भव्य ट्रॉलीत सजवलेल्या अंत्ययात्रेत असंख्य भक्तगण सहभागी झाले होते. मार्गावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव, भजन-कीर्तन आणि भक्तिगीतांच्या स्वरांनी वातावरण दुमदुमले होते. यावेळी कंजरभाट समाजाचे मोहन गारुंगे यांनी आरती करून दर्शन घेतले. तसेच नरेश बागडे, उमेश माछरे, राहुल नेतलेकर आदी समाजबांधवही उपस्थित होते.
सुखदेव महाराज हे निर्भय सद्गुरु सत्संग मंडळ संस्थेमार्फत अनेक अनुयायांना अध्यात्मिक मार्गदर्शन करत होते. ते कंजरभाट समाजातील श्री समर्थ सद्गुरु शिवराम महाराज यांचे पट्टशिष्य होते. आपल्या गुरुवर्यांची अखंड सेवा, साधना आणि भक्तिभाव यामुळे शिवराम महाराजांनी त्यांना सद्गुरुपद बहाल केले होते. साधेपणा, नम्रता आणि भक्तिभाव हेच सुखदेव महाराजांचे वैशिष्ट्य होते. ते वारंवार पंढरपूर, आळंदी आणि कोल्हापूर येथे दर्शनासाठी जात होते.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीही अहंकार नव्हता. साधे, सोपे आणि परम भक्तीशील जीवन हेच त्यांचे खरे धन होते. त्यांची प्रवचने, भजने आणि कीर्तने आजही असंख्य भाविकांच्या मनात भक्तिभावाचे बीज पेरत राहतील. श्री समर्थ सद्गुरु सुखदेव महाराज यांच्या स्मृती भाविकांच्या अंतःकरणात सदैव अमर राहतील. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, नातू, नातवंडे असा परिवार आहेत. ते ह.भ.प.निरंजन महाराज, बाळकृष्ण महाराज, विष्णू महाराज यांचे वडील होत.



