विविध संगीतावर विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्याद्वारे उपस्थितांची मने जिंकली
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रेमनगरातील बीयूएन रायसोनी स्कूल (सीबीएसई पॅटर्न) मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव नुकताच आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या पालक–शिक्षक संघाच्या सदस्यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेची आरती करून झाली. इयत्ता नर्सरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध संगीतावर मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
रिमझिम पावसाच्या सरींमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी थरावर थर रचून कान्ह्याच्या रुपात दहीहंडी फोडली. यावेळी “हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी कृष्ण, राधा, सुदामा आदींच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. दहीहंडीचा क्षण सगळ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे, शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी तसेच पालक–शिक्षक संघाचे सदस्य यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना गोपाळ काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. सुत्रसंचालन इयत्ता चौथीतील माहेश्वरी नेमाने, दुसरीतील वेदांत पाटील यांनी केले.