साईमत, जामनेर : प्रतिनिधी
भारतीय राज्यघटना आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. लोकशाही व्यवस्थेत कायद्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. सुजाण नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनावर शालेय वयातच कायद्याचा संस्कार रुजविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमुर्ती श्री.चामले यांनी केले. पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी हक्क आणि कर्तव्य, पोस्को, राष्ट्रीय प्रतिके, महापुरुष यांच्याप्रती आपण आदरभाव ठेवला पाहिजे, असे सहन्यायाधीश श्री.काळे, सह न्यायाधिश श्री.सूर्यवंशी यांनी आवाहन केले. प्रारंभी विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी शाळेतर्फे मान्यवरांचे औक्षण करण्यात आले. विद्यार्थिनींच्या लेझीम नृत्याने मान्यवर भारावून गेले. शारदा देवीच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन केले.
याप्रसंगी पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.चौधरी, ॲड. देवेंद्र पारळकर, ॲड. मोरे, ॲड. सचिन पाटील, ॲड. अतुल साळवे, व्हा. चेअरमन साहेबराव पाटील, संचालक राजधर पांढरे, रामेश्वर पाटील, ॲड. किशोर राजपूत, रविंद्र बाविस्कर, शेख सलीम, वरिष्ठ लिपीक किशोर पाटील, पत्रकार संघाचे प्रवीण कुमावत, जयंत जोशी, शंकर भामेरे आदी उपस्थित होते. शिबिराचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना लेखणी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे संचालक ॲड . एस . आर . पाटील, सुत्रसंचालन मराठी विभागाचे प्रमुख विजय बोरसे तर आभार मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील यांनी मानले.