The Control Of The Tractor : ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू

0
20

अपघातप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीच्या परिसरात सिमेंटने भरलेला ट्रॅक्टर चढावावर जात असताना चालकाचा ताबा सुटून उलटल्याने ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. अपघातातील मयत ट्रॅक्टर चालकाचे गणेश मोरसिंग चव्हाण (वय ४७, रा. भैरव नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) असे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सविस्तर असे की, ट्रॅक्टर चालवून गणेश चव्हाण परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. १२ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी रेल्वे मालधक्क्यावरून ट्रॅक्टर (क्र. एमपी-६८ ए-०६४६) सिमेंटच्या गोण्या भरल्या होत्या. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते अनुराग कॉलनीतील तीव्र चढावावरून जात होते. तेव्हा त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटले. त्यामुळे चव्हाण ट्रॅक्टरखाली दबले जाऊन गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

अपघाताची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी कॉन्स्टेबल योगेश माळी, संदीप सोनवणे, चंद्रकांत पाटील आणि झुलालसिंग परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करून चव्हाण यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यावर त्यांची तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here