साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
वीज महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी महिलांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, महावितरणच्या खासगी एजंटांची दादागिरी कोणत्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळे? सुरु आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसामान्य जनतेकडे कमी रकमा असून एकीकडे लाखो रुपयांचे वीज देयके थकीत असताना त्यांचा वीज पुरवठा नियमित सुरू राहतो. हजारो रुपयांचा विद्युत प्रलंबित असताना सर्वसामान्य जनतेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो, हे एक न उलगडणारे कोडे आहे. होणाऱ्या भ्रष्टाचाराला वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांची मूकसंमती तर नाही ना? अशी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय? खासगी कर्मचाऱ्यांच्या दादागिरीवर अंकुश ठेवतील का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे .
सविस्तर असे की, शहरातील मोहनपुरा भागातील रहिवासी शेख हाफीज शेख राऊफ यांचे विद्युत देयक प्रलंबित होते. त्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. परंतु मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान सुरू असल्याने शेजारी राहणाऱ्या त्यांच्या भावाकडून त्यांनी विद्युत पुरवठा काही काळासाठी घेतला होता. वीज महावितरणचे खासगी एजंट कलीम खान मतीन खान यांनी विद्युत ग्राहकाच्या घरात घुसून घरातील महिलांना अपशब्द वापरून व अश्लील भाषेचा वापर केला. ‘विद्युत पुरवठा तुम्ही दिला कसा, तुमचा पण विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल’, असे त्यांनी घरातील महिलांसह घरात उपस्थित वयोवृध्द हृदयाचे आजार असलेले अब्दुल हकीम अब्दुल रहीम (वय ६३) यांना दादागिरी करून सांगितले. त्यांनी सांगितले की, ‘तुम्ही आमचा विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे. तुम्हाला बोलायचे काही कारण नाही. मी तुमची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना करणार’ तर कलीम खान मतीन खान यांनी सांगितले की, ‘तुम्ही कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जा, माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही मी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून काम करत आहे. तसे अधिकार मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे’ अशी धमकी वजा ताकीद दिली. यावेळी घरात पुरुष मंडळी उपस्थित नव्हती.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खासगी लोकांना एवढे अधिकार दिले कसे? कोणत्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिले आहे. कलीम खान मतीन खान यांच्यासह शहरातील विविध परिसरात महावितरणचे खासगी लोक नागरिकांना त्रास देत आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्याचेच एक हे उदाहरण आहे. वीज महावितरण कंपनीच्या खासगी लोकांविरुद्ध अर्जदार अब्दुल हकीम अब्दुल रहीम यांनी पोलीस स्टेशन शहर मलकापूर येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.