महिलांना न्याय, हक्क मागण्याचा अधिकार संविधानाने दिला

0
9

मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई महाविद्यालयात युवती संवाद कार्यक्रमात रूपाली चाकणकर यांचे प्रतिपादन

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

महिलांना न्याय व हक्क मागण्याचा अधिकार संविधानाने दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान महिलांना वाचता यावे, म्हणून सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण दिले, असे प्रतिपादन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. मुक्ताईनगर येथे संत मुक्ताबाई महाविद्यालयात आयोजित युवती संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, भारतातील बेपत्ता मुली कुठे जातात, त्याचा शोध आयोगामार्फत घेण्यात आला. आखाती देशातून आतापर्यंत ७२ मुली देशात परत आणलेल्या आहे. मुलींनी नाव मोठे करावे. कर्तुत्व मोठे केले म्हणजेच की आपले नाव मोठे होते. सोशल मीडियावर ओळख करून प्रेमाने गोड-गोड बोलणाऱ्या मुली फसतात. त्यामुळे मुलींनी जागृत राहणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात फसलेल्या मुलींना प्रसंगी आत्महत्या करण्याची वेळ येते.म्हणून मुलींनी जागृत रहावे, असेही आवाहन त्यांनी केले.

उपवास करून हे सुटणार नाही. तुम्हाला कायदे माहित करण्यासाठी तुम्हाला बाबासाहेबांचे संविधान वाचावे लागेल. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मुलींना फातिमा शेख यांच्या समवेत शिक्षण दिले. मात्र, त्या शिक्षणाचा उपयोग मुलींनी बाबासाहेबांचे संविधान वाचनासाठी केला पाहिजे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. टवाळखोर मुलांची आता हयगय करायची नाही. त्यांना रस्त्यावर चोप द्यावा. बालविवाह रोखण्यासाठी मुलींनीच पुढाकार घेतला पाहिजे. पालकांना मुलींनी आपण शिक्षण आधी पूर्ण करू, असे ठणकावून सांगितले पाहिजे.

हुंडा देणे-घेणे हा गुन्हा असतानाही आजही त्याला अनेक बळी पडत आहेत. तोंड झाकून जगायची वेळ येत असेल तर आपला रस्ता चुकला आहे, असे समजावे. समोरच्याने ‘आरे’ म्हटले तर त्याला ‘कारे’ म्हणायची हिम्मत मुलींनी राखली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थिनींना देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी ‘दामिनी’ पथकाची नेमणूक करण्यात आलेली असून दामिनी पथकाला संपूर्ण विद्यार्थिनींसमोर व्यासपीठावर आणून त्यांची ओळख करून दिली.

याप्रसंगी आ.चंद्रकांत पाटील यांनी बोलताना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मुली सुरक्षित आहे. तुमचा भाऊ तुमच्या संरक्षणासाठी कायम उभा आहे, असे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे रूपालीताई स्वकर्तृत्वाने पुढे आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे मुलींनीही स्वतःला झोकून दिले पाहिजे. काही लोक बाप दादांच्या जीवावर बोलतात. मात्र मुलींनी स्वकर्तुत्वाने रूपालीताईंप्रमाणे पुढे येण्याचे आव्हान त्यांनी केले. तसेच आमच्या सरकारने मुलींना मोफत शिक्षण दिलेले असताना काही शैक्षणिक संस्था मात्र त्यांच्याकडूनही पैसे उकळत असल्याचे सांगत आ.चंद्रकांत पाटील यांनी खडसे परिवाराच्या शैक्षणिक संस्थांवरून टोला लगावला. याप्रसंगी प्राचार्य आय.डी.पाटील, सिमरन वानखेडे यांचीही भाषणे झाली.

शेवटी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मुलींना मार्गदर्शन केले. तसेच कायद्याचे ज्ञान दिले. विशिष्ट बाबींमध्ये टोल फ्री क्रमांकवर फोन करून आपल्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात यावी, यासंदर्भातही मार्गदर्शन केले. ऑनलाइन तक्रारी तसेच विविध पोलीस हेल्पलाइन क्रमांक देत मुलींना यावर तक्रार नोंदविण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमात एका मुलीने बसमधून येताना काही टवाळखोर मुले धक्के मारत असल्याचे सांगितले. त्यावर आपण जिल्हा आगार प्रमुखांची बैठक बोलावलेली असल्याचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. वंदना लव्हाडे यांनी केले.

यांची होती उपस्थिती

व्यासपीठावर आ. चंद्रकांत पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष उमेश नेमाडे, प्राचार्य आय. डी.पाटील, संस्थेचे संजय पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, सोनाली पाटील, अश्विनी मोगल, सिमरन वानखेडे, आनंदराव देशमुख, लीलाधर पाटील उपस्थित होते.

महसूल विभागाची अनुपस्थिती

महिला आयोगाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षाचा कार्यक्रम असतानाही महसूल विभागातर्फे कोणीही उपस्थित नव्हते. तहसीलदार, नायब तहसीलदार यापैकी कोणीही कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रवर्तन चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत

कार्यक्रमापूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई मंदिरात मुक्ताईचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रवर्तन चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. चौकात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुतळ्यांना आ.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी माल्यार्पण केले. महाविद्यालयातील कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी आ.पाटील यांच्या घरी अल्पोपहार करत कोथळी येथे श्री संत मुक्ताईचे दर्शन घेतल्यानंतर जळगावकडे रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here