कोजागिरीची रात्र संवाद अन् आपलेपणाचा सण
निसर्ग आणि मानवी मनाचा संगम म्हणजे शरद ऋतूतील ‘कोजागिरी पौर्णिमा’. कोजागिरीच्या आकाशात रुपेरी चांदणे उधळले असते. रात्री वारा थंडगार आणि मनात एक वेगळीच प्रसन्नता दाटली असते. ही रात्र केवळ चंद्र पाहण्याची नाही तर ही रात्र आहे मनशांती शोधण्याची… आपलेपणा अनुभवण्याची…कृतज्ञतेची. नवरात्रीच्या ‘फेस्टीव्हल’ नंतर आता सोमवारी, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमा सर्वत्र साजरी होणार आहे. त्यावर आधारित दै. ‘साईमत’च्या वाचकांच्या ज्ञानात भर पडावी, ह्या हेतूने प्रस्तुत लेखातून केलेला प्रयत्न…
कोजागिरी पौर्णिमेचा उगम ‘को जागर्ति?’ म्हणजे “कोण जागे आहे…?” या प्रश्नात दडलेला आहे. कथेनुसार, कोजागिरीच्या रात्री लक्ष्मीमाता भूमीवर अवतरुन पाहते की, कोण जागी आहे आणि आपल्या आयुष्यात श्रम, प्रामाणिकपणा आणि श्रद्धेने प्रयत्न करणाऱ्यांच्या घरी ती समृद्धीचा आशीर्वाद देते. म्हणूनच यादिवशी जागरण, संवाद, गाणी, हास्यविनोद आणि दुधाचा पेय सोहळा अशा सर्वांचा संगम अनुभवायला मिळतो. ही रात्र सामाजिक संवादाची आहे. शहरातील गच्च्यांवर आणि गावातील अंगणात परिवार, मित्रमंडळी एकत्र येतात. गरम दूध, केशर, वेलची, बदामाचा सुगंध हवेत दरवळतो. पण या दुधामागेही एक प्रतीक आहे… ते म्हणजे शुभ्रता, निर्मळता आणि आरोग्याचा संदेश.
शरद ऋतूची ही मोहक रात्र… आकाशात भरलेला शुभ्र चांदवा…, थंडगार वाऱ्याची कुजबुज… अंगणात सांडलेला रुपेरी प्रकाश…हाच आपल्या कोजागिरी पौर्णिमेचा आत्मा. वर्षभराच्या धकाधकीनंतर, शरीर आणि मन दोन्ही रात्री विश्रांती घेतात. एका रात्रीला केवळ “चंद्र पाहण्याचा दिवस” म्हणणं म्हणजे तिचं सौंदर्य कमी करणं ठरेल. कारण कोजागिरी पौर्णिमा म्हणजे भावनांचं उत्सव पर्व आहे. मन, नाती आणि संस्कार उजळवणारं. आपल्या पूर्वजांनी कोजागिरीचा उत्सव “शरद पौर्णिमा” म्हणून ओळखला. रात्री चंद्र पूर्ण कलांनी फुललेला असतो. म्हणतात, या रात्री चंद्राच्या किरणात औषधी गुण असतात. म्हणूनच थंडगार दूध पीत चांदण्याखाली बसण्याची परंपरा आजही जपली जाते. गावाकडं तर अंगणात चंद्र प्रकाशात ठेवलेलं दूध, त्यावर तरंगणारे बदाम-पिस्ते आणि त्या चवीत मिसळलेला चंद्रकिरणांचा गोडवा…हा अनुभव शब्दांत मावणारा नाही. त्या रात्री जेव्हा चांदणं अंगणात सांडतं, तेव्हा मनातही उजेड सांडतो. नाती पुन्हा जुळतात, आठवणी पुन्हा हसतात. आणि मग मनातून उमटते ती कोजागिरीची चारोळी…
चांदण्यात भिजू दे रे,
शब्दांना उब मिळू दे रे,
थकलेल्या मनाला आज
थोडी झोप येऊ दे रे…रुपेरी या क्षणांना जपा,
नाती नव्यानं विणा…,
हीच खरी ‘कोजागिरी’,
हीच जीवनाची प्रीती अमृता…!
आजच्या युगात कोजागिरी आपल्याला एक धडा शिकवते. तंत्रज्ञान, धावपळ आणि कृत्रिम प्रकाशाच्या युगातही मानवी नात्यांचा चंद्र मावळू नये. अशा एका रात्रीत चांदण्यात बसून जर आपण थोडावेळ स्वतःकडे पाहिले तर लक्षात येते की, आनंद खरे तर साधेपणात आहे. ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणजे फक्त धार्मिक सोहळा नाही तर ती आहे भारतीय संस्कृतीतील संतुलनाची भावना. श्रम आणि विश्रांती, शरीर आणि मन, भौतिक आणि आध्यात्मिक अशा सर्वांचा संगम ‘कोजागिरी’च्या रात्री साधला जातो. भारतीय सणांची परंपरा केवळ आनंदाचा प्रसंग नसतो तर तो जीवनाच्या तत्त्वज्ञानाची आठवण करून देतो. नवरात्रीच्या भक्तीमय जल्लोषानंतर येणारी ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणजे जणू चिंतन आणि शांततेचा सण. ही पौर्णिमा आपल्या संस्कृतीतील श्रद्धा, समाधान आणि सामुहिकतेचा संगम आहे. कोण गरीब, कोण श्रीमंत नाही. सर्वांसाठी उजळतो एकच चंद्र. दुधात केशर, वेलची, बदाम, आणि थोडीशी गोडी जशी जीवनातही लागते थोडी उबदारता, थोडी चव, थोडी प्रेमाची साखर. हे दूध फक्त पेय नाही तर निर्मळतेचा आणि आरोग्याचा संदेश आहे. दुधाचा शुभ्र रंग म्हणजे पवित्रतेचे प्रतीक… मनही असंच निर्मळ ठेवावे, हीच अशा सोहळ्याची शिकवण आहे. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक जण स्क्रीनमध्ये गुंतलेला आहे. संवाद हरवले आहेत… हास्य विसरले गेले आहे. अशावेळी कोजागिरी पौर्णिमा आपल्याला पुन्हा एकत्र आणते. रात्री हसणं, गाणं, खेळ, कथा… सगळं काही एकत्र अनुभवताना समाजातील बंध पुन्हा घट्ट होतात. ही रात्र संवाद आणि आपलेपणाचा सण आहे.
अंतर्मनातील चंद्र शोधण्याचा प्रयत्न
कोजागिरी फक्त बाहेरच्या चंद्राचा सण नाही तर आपल्या अंतर्मनातील चंद्र शोधण्याचा प्रयत्न आहे. आपल्या मनातही अनेक भावना, विचार, स्वप्नं आणि अंधार आहेत. चांदण्याच्या प्रकाशात बसून जर आपण थोडं आत्मचिंतन केले तर त्या अंधारातून एक शीतल प्रकाश जन्म घेतो… जो आपल्याला समजूतदार बनवतो, शांत बनवतो. ही रात्र शिकवते… जीवनातील खरा प्रकाश हा बाहेरून नव्हे, तर आतून उजळतो. कोजागिरी पौर्णिमा आपल्याला सांगते…जगण्याची मजा साधेपणात आणि एकत्रतेत आहे. जीवनात कितीही अंधार असो, चंद्रकिरणासारखं मन उजळवणं हेच खऱ्या अर्थाने जागरण आहे. म्हणूनच या रात्री केवळ चंद्र नव्हे, तर स्वतःच्या अंतःकरणातला प्रकाशही पहावा…तोच खरा “को जागर्ति?” या प्रश्नाचं उत्तर आहे.
मनाच्या आकाशातही चांदण्यांचा प्रकाश फुलवू या…!
चांदण्यांची ही कोजागिरी केवळ काव्यात्म नाही, ती आत्मीयतेची आठवण आहे. या रात्री आपण थोडं थांबावं, श्वास घ्यावा, चंद्राकडे पाहावं… आणि स्वतःला सांगावं…“मी जागा आहे…प्रेमासाठी, नात्यांसाठी आणि या सुंदर जीवनासाठी…! आजच्या काळात पैसा, स्पर्धा आणि गडबडीत माणसाने आनंदाचा श्वास हरवला आहे. कोजागिरी आपल्याला सांगते… थांब, पाहा, ऐका आणि जगा. जीवनात प्रत्येक दिवस हा एक पौर्णिमेचा क्षण बनवता येतो, जर आपण चंद्रासारखे शांत, प्रसन्न आणि प्रकाशमान राहिलो तर “चंद्रप्रकाशात न्हालेल्या रात्रीत, स्वतःचाही उजेड ओळखा… ‘कोजागिरी’ म्हणजे आत्मशोधाची वाट आहे.” अशा पौर्णिमेच्या उजेडात आपण सर्वांनी आपल्या मनातील अंधार झटकू या… मनाच्या आकाशातही चांदण्यांचा प्रकाश फुलवू या…!
“चंद्राच्या रुपेरी उजेडासारखा आपला विचारही निर्मळ व्हावा,
हीच ‘कोजागिरी’ची खरी प्रार्थना.”