साईमत, जळगाव : प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पातून आ.सुरेश दामु भोळे यांच्या प्रयत्नातून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यापैकी काव्यरत्नावली चौक ते टॉवर चौक रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. यावेळी अधिकाऱ्यांसह आमदार भोळे यांनी पाहणी करीत उत्तम प्रकारे काम करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी नारळ वाढवून कार्याला सुरुवात झाली.
शहराचा दुरोगामी विकास लक्षात घेता शहरात व्हाईट टॉपिंग पद्धतीचे काँक्रीटचे उत्तम दर्जाचे रस्ते झाले पाहिजे, असा मानस ठेऊनच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांसोबतच विविध प्रभागातील कॉलनी एरियामधील रस्त्यांची कामे सुद्धा नियोजनात्मक पद्धतीने करण्यात येत आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पातील ८५ कोटींच्या निधीतून मुख्य रस्त्यांची कामे व त्यासोबतच नगरविकास विभागाकडून मिळालेल्या १०० कोटींच्या निधीतून विविध प्रभागातील कॉलनी एरियामधील रस्त्यांच्या कामांना सुरुवात झालेली आहे. नागरिकांच्या भावना ओळखून येत्या २-३ महिन्यात उर्वरित सर्व रस्त्यांची कामे टप्प्या-टप्प्याने पूर्ण करुन ना.देवेंद्र फडणवीस व ना.गिरीश महाजन यांच्याहस्ते लोकार्पण केले जाईल. तसेच ‘आभाळ खूप फाटलेले आहे.. तरी एक-एक टाका मारत पुढे जायचं माझं प्रामाणिक प्रयत्न आहे,’ असे मनोगत आ.राजुमामा भोळे यांनी व्यक्त केले.
राज्यात भाजपाचे सरकार येताच जळगाव कलेक्टोरेट रस्त्याची सुधारणा करण्यासाठी आ.भोळे यांनी तत्काळ कार्य हाती घेतले. या कार्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २६ ऑक्टोबर २०२३ रोजी कार्यारंभ आदेश प्राप्त झाले आहे. रस्त्याच्या कामाला गुरुवारचा मुहूर्त मिळाला. सोबतच निमखेडीचा जुना हायवे रस्ता, सुरत रेल्वेगेट ते शिवाजीनगर रस्ता, मोहाडी रस्ता, अजिंठा चौक ते नेरी नाका रस्ता, वाघ नगर ते गिरणा पंपिंग रस्ता या सर्व रस्त्यांसाठी कार्यारंभ आदेश झाले आहे. येत्या काही दिवसांमध्येच कार्याला सुरुवात होणार आहे.
यावेळी भाजपच्या महानगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, माजी नगरसेवक सदाशिव ढेकळे, स्थायी समितीचे माजी सदस्य राजेंद्र घुगे-पाटील, माजी नगरसेवक धीरज सोनवणे, अजित राणे, विशाल त्रिपाठी, ज्येष्ठ नागरिक मंच व स्टेट बँक पेंशनर्सचे गोकुलदास सुराणा, विजय मुळे, ए.बी. कुलकर्णी, बी.आर. तायडे, रमेश सरोदे, पी.एम. खंबायत, एम.पी. रेंभोटकर, रमेश राजहंस, एम.एल. काबरा, उदय नारखेडे, पी.एन. चौधरी, प्रा.घनश्याम मोहरीर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.