सीएमव्ही बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच भरपाईची रक्कम होणार जमा

0
23

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील ५ हजार ९५८ सीएमव्ही बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत प्रकरण ऑनलाईन झाले आहे. उद्यापासून त्यांना सजा स्तरावर विशिष्ट क्रमांक (व्ही.के. क्रमांक) उपलब्ध होईल आणि केवायसी झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा होईल, अशी माहिती आ.चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तहसील कार्यालयात महसूल व कृषी विभागाच्या आढावा बैठकीत दिली.

पी.एम. किसान योजना व सीएमव्हीबाबत शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी अनुदान व नुकसान भरपाईबाबत वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी व शेतकऱ्यांची होणारी फिरफिर याची दखल घेत कृषी व महसूल विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदारांच्या दालनात तहसीलदार निकेतन वाडे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आनंदराव देशमुख, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, आ. पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, दिलीप पाटील चोपडे, पंकज कोळी, विनोद पाटील व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेतली.

गाव पातळीवर शिबिर

पी.एम. किसान योजनेत लाभार्थी तांत्रिक अडचणीमुळे लाभापासून वंचित असल्याचा मुद्दा समोर आला होता. उपाय योजना म्हणून शेतकऱ्यांची अडचणी सोडविण्यास कृषी विभाग पुढील आठवड्यापासून गाव पातळीवर शिबिर घेणार आहेत. यामध्ये ई-केवायसी तसेच तांत्रिक अडचणी सोडवून झिरो पेंडन्सी करून तालुक्यातील १९ हजार ९१५ शेतकऱ्यांना पीएम किसान लाभार्थीपैकी वंचित असलेल्या १ हजार ६०० लाभार्थ्यांची ई-केवायसी करून घेणार आहेत. पी.एम.किसान व सीएमव्हीसह अन्य अनुदान प्रकरणे करून देणाऱ्या गाव पुढाऱ्यांना आता पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा आ.चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. याबाबत पोलिसांकडे चिरीमिरी करणाऱ्यांची नावे कळविल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून वचनपूर्ती : आमदार पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगर येथील दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सीएमव्ही नुकसानी संदर्भामध्ये शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल, असा शब्द दिला होता. पहिल्यांदाच सरकारने शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here