जळगावच्या विकासाला नवी गती
साईमत /मुंबई/प्रतिनिधी : –
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आमदार राजूमामा भोळे यांच्या सक्षम आणि निर्णायक नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवत सर्वच्या सर्व ४६ जागांवर दणदणीत बाजी मारली आहे. या अभूतपूर्व यशानंतर आमदार भोळे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार भोळे यांचा विशेष सत्कार करत त्यांच्या नेतृत्वाचे मनापासून कौतुक केले आणि जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने उभे राहील, असा विश्वास व्यक्त केला.
जळगाव महापालिकेच्या ४६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचाराची रणनीती अवलंबली होती. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची धुरा आमदार राजूमामा भोळे यांनी स्वतःकडे घेतली होती. ‘विकास’, ‘पारदर्शक प्रशासन’ आणि ‘जनतेशी थेट संवाद’ हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवत त्यांनी शहरातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम निकालात स्पष्टपणे दिसून आला. भाजपने सर्व ४६ जागा जिंकत विरोधकांना एकाही जागेवर खाते उघडू दिले नाही. या विजयामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या ऐतिहासिक विजयाची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आणि पुढील विकासात्मक नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी आमदार भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले आणि निवडणूक व्यवस्थापन, कार्यकर्त्यांची बांधणी तसेच जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या भोळेंच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जळगावकरांनी भाजपवर जो प्रचंड विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. आमदार राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि विकासकामांना गती देण्यात येईल.”
दरम्यान, आमदार राजूमामा भोळे यांनी या विजयाचे श्रेय स्वतःकडे न घेता जळगावातील कार्यकर्ते आणि जनतेला दिले. ते म्हणाले, “हा विजय माझा नसून जळगावातील प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि विश्वास टाकणाऱ्या जनतेचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्याचे हे फलित आहे. आता राजकारणापेक्षा जळगावच्या सर्वांगीण विकासावरच आमचे संपूर्ण लक्ष राहील.”
४६ पैकी ४६ जागांचा हा विजय केवळ निवडणुकीतील यश न राहता, जळगाव शहराच्या विकासासाठी नव्या पर्वाची सुरुवात ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
