विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य, उच्च ध्येय गाठण्याविषयी मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागात योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरण तसेच गुणवंतांचा गुणगौरव सोहळा योग हॉलमध्ये नुकताच पार पडला. सोहळ्यास कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. किशोर एफ. पवार, आंतरविद्याशाखीय अभ्यासप्रशाळेच्या प्रमुख डॉ. मनीषा इंदाणी, योगशास्त्र विभागाचे प्रमुख इंजि.राजेश पाटील उपस्थित होते. सोहळ्यात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वितरण करण्यात आले. यावेळी अमर हटकर क्रीडा विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच एकनाथ नन्नवरे यांचा योगशास्त्र विभाग टीचिंग असो. नियुक्ती झाल्याबद्दल कुलसचिव डॉ. विनोद पाटील तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात योग थेरेपीचे सहायक प्राध्यापक डॉ. लीना चौधरी यांनी ओंकार प्रार्थना सादर केली. याप्रसंगी इंजि.राजेश पाटील यांनी योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमासह योगशास्त्र विभागामार्फत उपलब्ध असलेल्या एम.ए. योगशास्त्र, सर्टिफिकेट कोर्स इन मसाज थेरपी तसेच विविध कौशल्य वृद्धिंगत करणारे सर्टिफिकेट अभ्यासक्रम यांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमात सुरक्षारक्षक प्रमुख शेखर बोरसे यांनी मनोगतात बांभोरी येथील रहिवासी एकनाथ नन्नवरे यांच्या मेहनतीच्या प्रवासाचे वर्णन केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनी प्रिया चौधरी, अनिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अमर हटकर यांनी सेट परीक्षेबाबत आणि त्याच्या फायद्यांबाबत माहिती दिली. त्यानंतर एकनाथ नन्नवरे यांनी शिक्षणाच्या अडचणींवर मात करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाने उच्च पद गाठल्याबाबत अनुभव सांगितला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य आणि उच्च ध्येय गाठण्याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. मनीषा इंदाणी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
सोहळ्यास विद्यार्थी, सुरक्षारक्षकांसह १०० जण उपस्थित होते. यशस्वीतेसाठी तुषार सोनवणे, माधवी तायडे, रत्नाकर सोनार, भगवान साळुंखे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक प्रा. गीतांजली भंगाळे तर आभार योग थेरेपीच्या सहायक प्राध्यापक प्रा. लीना चौधरी यांनी मानले.