उसनवारी पैसे देणे भोवले : डोक्यात हातोडा घालून केला खून; “कॉल डिटेल्स” वरून लागला छडा ; महिलेसह तीन जणांना घेतले ताब्यात
साईमत/जळगाव/न.प्र.
शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये व्यापाऱ्याच्या पत्नीचा डोक्यात हातोड्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघड झाली होती. दरम्यान, उसनवारी दिलेले पैसे संशयित आरोपींकडे मयत महिलेने वारंवार मागून तगादा लावला म्हणून एका महिलेसह तिघांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि एलसीबीचे पथक यांनी २० तासात याचा उलगडा करून तिघांना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर असे की, शहरातील गणेश वाडी परिसरातल रणछोड नगर मध्ये दाणा बाजार परिसरातील धान्याचे व्यापारी राजेश नवाल राहिवासाला आहे. गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी राजेश नवाल यांच्या पत्नी सुवर्णा राजेश नवाल (वय ५७) या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला.
एलसीबीने मयत सुवर्णा नवाल यांचे मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स तपासले. त्यात एका नंबरवर दिवसात सारखे ४ ते ५ वेळा फोन आल्याचे दिसले. त्या दृष्टीने तपासले असता पोलीस संशयित आरोपी लालबाबू उर्फ लाला रामनाथ पासवान (वय ४३, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्यापर्यंत पोहोचले. तसेच, तपासानुसार आणखी दोघे सरलाबाई धर्मेंद्र चव्हाण (वय ४२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), राजेंद्र उर्फ आप्पा रामनाथ पाटील (वय ५८, रा. म्हसावद ता. जळगाव) यांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर तिघांना पोलिसी खाक्या दाखविताच तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. यामागील घटनाक्रम ऐकून पोलिसही काही काळ स्तब्ध झाले.
मयत सुवर्णा नवाल यांच्या घरी संशयित सरलाबाई ही काम करायला २०१६ सालापासून येत होती. तेव्हापासून त्यांचे ओळखी होती. यातून सुवर्णा यांनी सरलाबाई हिला उसनवारी ३ लाख रुपये दिले होते. मात्र सरलाबाईने ते परत केले नाही. तसेच दुसरा संशयित लाला पासवान यालाही ५० हजार रुपये मयत सुवर्णा यांनी दिले होते. तर लाला हिच्या पत्नीला काही दागिने दिले होते. ते तिने एका सराफाकडे गहाण ठेऊन त्याबदल्यात पैसे काढले होते. आता सुवर्णा नवाल या दोघांकडे पैसे परत मिळावे म्हणून तगादा लावत होत्या. त्यात दोघे टाळाटाळ करीत होते. त्यातच सरलाबाई हिच्या ओळखीचा तिसरा संशयित राजेंद्र उर्फ आप्पा याने अजून पैसे उधार मिळावे म्हणून सुवर्णा हिच्याकडे पैशांची मागणी केली होती. ते देण्यास सुवर्णा नवाल यांनी नकार दिला होता.
दरम्यान, १० ऑक्टोंबर रोजी सुवर्णा यांनी दिवसभरात लाला याला फोन करून उसनवारी दिलेले पैसे परत मागितले. सततच्या तगाद्याला कंटाळून अखेर लाला पासवान, सरलाबाई आणि राजेंद्र यांनी काल गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता रणछोड नगरातील सुवर्णा नवाल यांचे घर गाठले. तेथे पैसे परत मागण्यावरून महिलेशी तिघांचे वाद झाले. त्यातून लाला पासवान याने सुवर्णा यांच्या डोक्यात हातोड्याचे २ जबर वार करून त्यांना संपविले. तेथून तिघे पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी “कॉल डिटेल्स” काढून तिघांचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील हातोडा जप्त केला आहे.
यांनी केली कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीएसआय दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, विजयसिंग पाटील, राजेश मेंढे, संजय हिवरकर, एमआयडीसीचे पीएसआय दीपक जगदाळे, पीएसआय शरद बागल, सिद्धेश्वर डापकर, नितीन ठाकूर, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, गणेश ठाकरे, रतन हरी गीते, अर्चना गायकवाड आदींनी केली आहे.