सावंतवाडी :
पर्वरी गोवा येथील फ्लॅटवर एका युवतीचा खून करून मृतदेह आंबोली घाटात फेकून देण्यात आला होता. आज सावंतवाडी आणि गोवा पोलिसांच्या पुढाकाराने सुमारे ७० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या स्त्री जातीच्या मृतदेहाचा एक हात व पाय आढळून आला नसल्याचे शोध पथक व पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी दोघा संशयितांना घटनास्थळी आणले होते. त्यांनी दाखविलेल्या अंदाजाने सावंतवाडी पोलीस व आंबोलीच्या रेक्सु टीम ने शोध घेत मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला.
प्रेयसीने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून म्हापसा येथील कामाशी शंकर उडपनव (२८) युवतीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवा पोलिसांच्या तपासात शुक्रवारी उघड झाला आहे. संशयित आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक आंबोली घाटात पोहचले. त्यांना तो मृतदेह सापडला. त्यानंतर आंबोली रेक्सु टीमच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढला.
गोवा पर्वरी येथे दि.३० ऑगस्टला खून करण्याचा भयंकर प्रकार घडला आहे.या प्रकरणी संशयित म्हणून प्रकाश चुंचवाड (२२) ताब्यात घेतले तर दुसऱ्या निरूपदी कड (२२) यालाही आंबोली येथे आणण्यात आले होते. यामध्ये निरूपदी कड याचा समावेश असल्याचे गोवा पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघा संशयित आरोपींना आंबोली येथे आणण्यात आले आहे. त्यांनी मृतदेह टाकल्याची जागा दाखविली, असे पोलिसांनी सांगितले.
म्हापसा पोलीस ठाण्यात मुलीची बेपत्ता तक्रार दाखल झाली असली तरी तिचा खून पर्वरी गोवा येथे झाला आहे असे पोलिसांनी म्हटले आहे. मयत कामाशी उडपनव (३०) ही तिच्या गोवा पर्वरी येथील फ्लॅटवर एकटी राहात असल्याची संधी साधून बुधवार दि.३० ऑगस्टला दुपारच्या सुमारास आरोपीने चाकूने भोसकून खून केला होता. तो मृतदेह गाडीतून आणून त्याच दिवशी रात्री आंबोली घाटात फेकला होता.दरम्यान आपली बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने २९ ऑगस्टला म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार तपास म्हापसा पोलिसांनी केला.
