९१ जणांच्या टीममध्ये २६ महिलांना संधी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या पश्चिम विभागाची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी जाहीर केली आहे. ९१ जणांच्या टीममध्ये २६ महिलांना संधी देण्यात आली. त्यात मराठा समाजाला झुकते माप देताना इतर समाजांच्या प्रतिनिधींनाही स्थान देण्याची खबरदारी घेण्यात आली आहे.
डॉ. राधेशाम चौधरी यांची मे महिन्यात भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर आठ तालुके अर्थात सहा विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित केली गेली आहे. डॉ. चौधरींच्या ९१ जणांच्या टीममध्ये २६ जणांची मुख्य कार्यकारिणी आहे. त्यात एक जिल्हाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष, चार सरचिटणीस, १० उपाध्यक्ष व १० चिटणीस यांचा समावेश आहे. कार्यकारिणी सदस्यांची ६५ जणांचा यादीत समावेश आहे.
२६ पैकी १८ महिला पदाधिकारी उच्च शिक्षीत
त्यात प्रत्येक तालुक्यातील तीनपेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे जुने, नवीन कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना संधी देण्याची काळजी घेतली आहे. त्यात २६ पैकी १८ महिला पदाधिकारी पदवीधर, पदविका व त्यापेक्षा जास्त शिकलेल्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत यशस्वी नेतृत्व करणाऱ्या अनुभवी चेहऱ्यांचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे एससी, एसटी, एनटी, ओबीसी समाजासोबत व्यापारी, वकील, व्यावसायिक अशा सर्वसमावेशक वर्गाला प्रतिनिधीत्व दिल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
‘नवीन पिढीला संधी’ अन् ‘शिक्षणावर भर’
भाजपने यापूर्वीच पश्चिम जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत बाविस्कर आणि महानगर जिल्हाध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. त्यामागे जातीय व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. बाविस्कर आणि सूर्यवंशी हे मराठा समाजाचे तर चौधरी गुर्जर समाजाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. अशा प्रकारे दोन मराठा व एक गुर्जर अशा फॉर्म्युल्यावर जातीय समीकरण बसवले गेले. त्याचे पुढचे पाऊल टाकत डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पश्चिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. त्यामागे त्यांनी पूर्वी लोकसभा क्षेत्र प्रमुख म्हणून केलेल्या कामाचा अनुभव वापरला आहे. कार्यकारिणीत भाजपने ‘नवीन पिढीला संधी’ आणि ‘शिक्षणावर भर’ अशा दोन मुद्द्यांवर संघटनेला नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीत जळगाव महानगरपालिका तसेच पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊनच ही संघटनात्मक मांडणी केली आहे. त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला कितपत होईल… ? त्याचे उत्तर आगामी काळातच मिळणार आहे.
