जगातील इतर भाषांमधील सर्वोत्तम साहित्य मराठीत आणले पाहिजे

0
14

समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमांप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर यांचे प्रतिपादन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

मराठी भाषा मुळातच अभिजात भाषा आहे. आता राजमान्यता मिळाल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मराठी भाषेबरोबर इतर भाषांचेही ज्ञान मिळविले पाहिजे. जगात इतर भाषांमध्ये जेजे चांगलं साहित्य आहे. ते आपल्या मराठी भाषेत आणले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर
यांनी केले. माय मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाला. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. त्यानिमित्त साहित्यिक, रसिक व मराठी भाषाप्रेमींना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी ‘समाज चिंतामणी प्रतिष्ठान’तर्फे भगीरथ इंग्लिश स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखिका मायाताई धुप्पड उपस्थित होत्या. यावेळी प्रतिष्ठानतर्फे पेढे वाढून आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी साहित्यिक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी कवी निंबा बडगुजर, वर्षा अहिरराव, विशाखा देशमुख, विजय लुल्हे, डी. बी. महाजन, भास्करराव चव्हाण, युवराज सोनवणे, आर. जे. सुरवाडे, गोविंद पाटील, प्राचार्य नारायण पवार, निवृत्तीनाथ कोळी, मीना सैंदाणे, प्रज्ञा नांदेडकर, संतोष साळवे, किशोर पाटील, अशोक पारधे, किशोर नेवे, स्वप्निल महाजन, गोविंद बावने, डॉ. दिनेश महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती राणे तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांनी आभार मानले.

मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाल्याबद्दल निवडक प्रतिक्रिया

जी भाषा आपल्याला दुसऱ्यांनी आपलीशी करावी असे वाटते, त्या भाषेत सकस साहित्य निर्माण झाले पाहिजे. काय लिहावे यापेक्षा काय लिहू नये, ही काळजी साहित्यिकांनी घेतली पाहिजे. आता साहित्यिकांची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे ज्येष्ठ लेखिका मायाताई धुप्पड यांनी सांगितले. साने गुरुजींचे अांतरभारतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मराठी भाषा भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये शिकविली जाईल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण यांनी व्यक्त केले. लोकभाषांना दुय्यम स्थान न देता त्या भाषांमधील पुरस्कृत साहित्यकृतींचे वाचन, मंथन व संबंधित साहित्यिकांची चर्चासत्रे घेऊन साहित्य तळागाळातील वाचकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी साहित्यिकांनी घेतली पाहिजे, असे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी समूहाचे संस्थापक विजय लुल्हे यांनी सांगितले. जळगावमध्ये भव्य मराठी भाषा भवन निर्माण झाले पाहिजे, असे मत मराठी भाषाप्रेमी गोविंदराव बावणे यांनी व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here