बँकेने नाईलाजास्तव ‘शून्य टक्के’ व्याजदराची सवलत केली बंद

0
21

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

चालू खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड निर्धारित वेळेत केल्यास तीन लाखापर्यंत केंद्र शासन ३ टक्के तर डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ३ टक्के व्याज परतावा मिळणार आहे. केंद्राचा परतावा हा थेट थेतकऱ्यांच्या बचत खात्यात (डीटीबी) जमा होणार आहे. त्यामुळे बँकेला नाईलाजास्तव शून्य टक्के व्याजदराची सवलत बंद करावी लागल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी रिंग रोडलगतच्या बँकेच्या मुख्य शाखेच्या आवारात आयोजित सर्वसाधारण सभेत सांगितले. यावेळी अजेंड्यावरील दहा विषय अवघ्या ३० मिनिटात मंजूर करण्यात आले. यावर्षी बँक प्रथम व्याजासहित कर्ज वसूल करेल. नंतर शेतकऱ्यांना शासनाकडून व्याज परत मिळणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

सभेला जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन अमोल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, संचालक आ.चिमणराव पाटील, आ.डॉ.सतिष पाटील, ॲड. रवींद्र पाटील, प्रताप हरी पाटील, नाना पाटील, मेहताबसिंग नाईक, संचालिका शैलजादेवी निकम, जयश्री महाजन, जनाबाई महाजन तसेच उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सदस्य, बँकेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

शेती, बिगरशेती संस्था व व्यक्तीगत कर्जासाठी एक रकमी परतफेड योजना बँकेने राबविलेली आहे. या योजनेपोटी बँकेचे १.३२ कोटी व्याजाचे नुकसान झाले आहे. २१ डिसेंबरपर्यंत या योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. अनिष्ठ तफावत वाढल्यामुळे मागील वर्षाच्या शेती कर्ज एनपीएमध्ये ५.७३ टक्के वाढ झाली आहे. आता ४१.१४ टक्के एनपीए झालेला आहे. अशाही परिस्थितीत बँकेने आतापर्यंत १ लाख ७९ हजार ७८२ शेतकऱ्यांना ८८० कोटी रुपयांचे पीक कर्ज स्वभांडवलातून वाटप केल्याचे संजय पवार यांनी सांगितले. जिल्ह्यात ५५१ विकासो अनिष्ठ तफावतीत असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हा बँकेच्या स्थापनेला १०७ वर्ष पूर्ण

जिल्हा बँकेच्या स्थापनेला १०७ वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्त शेतकऱ्यांच्या पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण लागू केले आहे. ३१ मार्चपर्यंत बँकेच्या ठेवी ३ हजार ४९५ कोटी होत्या. त्यात वाढ होऊन आज अखेर ३ हजार ७४६ कोटी इतक्या झाल्या आहेत. बँकींग रेग्युलेशन ॲक्टच्या कलम १८ व २४ नुसार आवश्यक असणारी रोखता व तरलता बँकेने वर्षभर नियमाप्रमाणे ठेवली आहे. बँकेची गुंतवणूक २ हजार ३१२ कोटी रुपये इतकी असल्याचे पवार यांनी सभेत स्पष्ट केले. ३१ मार्च अखेर १०७ कोटी ९१ लाख रुपये नफा झाला. सतत वाढत जाणारी अनिष्ठ तफावत लक्षात घेता मोठ्या प्रमाणात एनपीए कर्जाची तरतूद करावी लागली आहे. १०३ कोटी ८९ लाखाची तरतूद केल्याने बँकेला बँकेला ४ कोटी २ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here