सावखेडा यात्रेचा परिसर शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला ‘चकाचक’

0
11

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथे भैरवनाथ महाराजांचे जागृत देवस्थान आहे. याठिकाणी तब्बल महिनाभर यात्रा भरत असते. जळगाव जिल्ह्यातून भाविक भक्त यात्रेला येतात. याठिकाणी यात्रेत वेगवेगळ्या दुकानांचे स्टॉलही लावलेले असतात. त्यामुळे पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिक कचरा, कागद, नारळाचे टरफले त्याठिकाणी पडून असतात. यात्रा झाल्यानंतर परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच रस्त्यावरून माणुसकी रुग्णसेवा समुहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या नजरेस हे दृश्‍य पडले. त्यांनी त्याच दिवशी तात्काळ सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द आणि राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेत भेटी दिल्या. शाळेला मंदिराचा परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली. त्यांच्या निस्वार्थी सेवेला सर्व तिन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर मंदिराचा परिसर स्वच्छ करुन चकाचक करण्याचे काम हाती घेतले. स्वच्छतेचे कार्य सकाळी ९ ते ११ या वेळेत करण्यात आले. स्वच्छतेसाठी सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, राजुरा येथील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप जैन, गजानन क्षीरसागर, पिंपळगाव हरेश्‍वर येथील समाजसेविका नंदा पाटील, सावखेडाचे सरपंच सुमन वाघ, राजुरा शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा उदावंत, सावखेडा बुद्रुकच्या मुख्याध्यापिका सुशीला वानखेडे, सावखेडा खुर्दच्या मुख्याध्यापिका विद्या सोनार, सुषमा गोसावी, प्रदीप पाटील, माधुरी ओतारी, नूतन चौधरी, योगेश जाधव यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. यासाठी भैरवनाथ महाराज मंदिराचे ट्रस्ट सदस्य सुनील परदेशी, सुभाष परदेशी, नितीन पाटील, पद्म परदेशी, किरण पाटील, सदाशिव बडगुजर, मंदिराचे पुजारी बाबा यांनी सहकार्य केले. याबद्दल सर्व माणुसकी गु्रपचा आणि मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here