साईमत लाईव्ह पारोळा प्रतिनिधी
येथील बस स्थानकात शाळा सुटल्यानंतर एक वाजेची बस ही वेळेवर सुटत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी चक्क बस स्थानकात पाऊणतास बस रोको आंदोलन केले. पाऊण तासाच्या आंदोलनावर लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले
पारोळा तालुक्यात ११४ खेडे आहेत या गावांना एरंडोल व अमळनेर विभाग संयुक्तपणे बस सेवा पुरविते यांचा सर्व कारभार अमळनेर विभाग पाहत असतो मात्र दोन्हीही आगार पारोळ्याला नेहमी सावत्रपणाची वागणूक देतात, वेळेवर बसेस पुरवल्या जात नाही, नागरिकांच्या समस्या ऐकली जात नाही, कधी कधी तर लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यावर या आगारांमधील अधिकारी दुर्लक्ष करतात, बस स्थानकात समस्यांचा पाढा हा नेहमीच आहे, त्याच्यावर महामंडळ ठोस उपाय योजना करण्यास अनुकूल दिसत नाही त्यामुळे येथील प्रवाशांचे हालअपेष्टा नेहमीच होत असतात.
ग्रामीण भागातून पारोळा शहरात शिकण्यासाठी सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थी हे नेहमी दररोज बसणे अपडाऊन करतात. या पार्श्वभूमीवर अमळनेर आगाराकडून वेळेवर बस सोडल्या जात नसल्याने पारोळा येथील शाळा सुटुन देखील विद्यार्थ्यांना तासन्तास बस स्थानकात बसची वाट पाहत ताटकळत राहावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. तामसवाडी करमाड, रताळे येथील शाळेतील विद्यार्थी बारा वाजता बस स्थानकात आले असता त्यांना जाण्यासाठी दुपारी एक वाजेची सुटणारी बस अडीच वाजेपर्यंत लागलीच नव्हती. हे एक दिवसाचे नसून एक दिवसाआड रोज नेहमीच असेच होत असल्याने सकाळपासून शाळेत आलेले भुकेले विद्यार्थी -विद्यार्थिनी घरी जाण्यासाठी व्याकुळ झाले असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी बस स्थानकाच्या आवारातच बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ खाली बसून रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात किमान दीडशे ते दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते अर्धा ते पाऊण तासापर्यंत रस्ता रोको करण्यात आला.
बस स्थानकातून एकही बस जात नव्हती व येतही नव्हती यानंतर माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी अमळनेर आगार प्रमुख चौधरी यांच्याशी या विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीवर बोलणे झाले त्यानंतर माजीमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या सांगण्यावरून त्यांना येथील स्थानक प्रमुख संजय पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तोपर्यंत बसस्थानकात व बस स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.यानंतर तीन वाजेच्या सुमारास ०४१९ क्रमांकाची बस तामसवाडी, करमाळ,रताळे या मार्गासाठी सोडण्यात आली होती.
यापुर्वीही ९ सप्टेंबर रोजी आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे याबाबत विद्यार्थ्यांनी समस्या सांगितली होती.त्यानंतर आमदारांनी आगार प्रमुखांशी बोलून त्यांना लेखी पत्र दिले होते. तरी देखील अधिकार्यांनी मनमर्जी चालूच ठेवल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. लेखी आश्वासन मिळाले असले तरीही बस सुरळीत न झाल्यास विद्यार्थ्यांनी पुन्हा रस्ता रोको करू असा इशारा दिला आहे.