जुन्या आठवणींना मिळाला उजाळा ; ५५ विद्यार्थ्यांची उपस्थिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रेम नगरातील महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २००२ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. मेळाव्यात शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. कार्यक्रमाला जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, मुख्याध्यापिका साधना शर्मा, शिक्षिका सुनीता मांडे, शिरसाठ, कवी प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.राजू मामा भोळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनातील सकारात्मक विचार, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकी यांवर मार्गदर्शन केले. कवी प्रकाश पाटील यांनी आपल्या खास शैलीत “भ्रूणहत्या” आणि “मुलांनो अपसेट होऊ नका” या कविता सादर करून वातावरण रंगतदार केले. सभागृहात विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेत आल्याचा आनंद व्यक्त करत आनंदाने फेटा बांधला. स्नेहमेळाव्यात तब्बल ५५ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रत्येकाने आपला परिचय करुन देत जुन्या आठवणी शेअर केल्या. शेवटी खेळ, गाणी आणि नृत्यांनी स्नेहमेळावा अधिक रंगतदार झाला. प्रास्ताविक तथा आभार महारु शिवदे यांनी मानले. सूत्रसंचालन विशाल सिसोदे, प्रा. रूपाली सूर्यवंशी यांनी केले.



