जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयातील १९९७ ते २००५ दरम्यान शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा दिवाळीच्या सुट्टीनिमित्त महाविद्यालय परिसरात नुकताच स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. स्नेहमेळाव्यात सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प व्यक्त केला.
ग्रंथालय कट्ट्यावर सर्व माजी विद्यार्थी एकत्र जमले होते. महाविद्यालयीन जीवनातील गप्पा, गोष्टी, किस्से आणि आठवणींना उजाळा देत आनंदाने वेळ घालवला. स्नेहमिलनाने “त्या काळातील महाविद्यालयीन दिवस पुन्हा जिवंत झाल्याची” भावना सर्वांच्या चेहऱ्यावर उमटली. याप्रसंगी भूगोल विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक गणेश सोनार यांची सदिच्छा भेट घेऊन महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत चर्चा केली. स्नेहमेळाव्याचे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे स्वीय सहाय्यक विनोद मोरे (मामा) यांनी आयोजन केले होते.
कार्यक्रमाला जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे कर्मचारी ललित पारधे, जामनेरातील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. समीर घोडेस्वार, उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगरचे ॲड. सुशील त्रिपाठी, ॲड. ललित तेली (जळगाव), जैन इरिगेशनचे नरेंद्र जगताप, बी.यू.एन. रायसोनी इंग्लिश मीडियम स्कुलचे क्रीडा शिक्षक योगेश सोनवणे, पत्रकार मिलिंद वानखेडे, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे प्रशिक्षण समन्वयक पंकज पाटील, व्यावसायिक विजय शिंपी, लँड डेव्हलपर पंकज फुले, शेअर मार्केट प्रशिक्षक सुनील साळवे आणि कलर अँड फर्निचर कॉन्ट्रॅक्टर भागवत मिस्तरी आदी उपस्थित होते.



