साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी
‘वई वई येजो व मनी कानबाई माय… लव्ह लव्ह चाल माता माथे ऊना याय व…’ यासह विविध अहिराणी-मराठी गीतांच्या मधुर आवाजात बँड व डीजेच्या तालावर नाचत, ठिकठिकाणी महिला-युवतींनी फुगडी खेळत जल्लोषात सोमवारी खानदेशचे कुलदैवत कानुबाईमातेला निरोप देण्यात आला.
हिंदू धर्मातील गणेशोत्सव, नवरात्र व कानुबाई उत्सव नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत जल्लोषात साजरे केले जातात. हे तिन्हीही उत्सव सामाजिक, कौटुंबिक एकता टिकवून ठेवणारे आहेत. सणानिमित्त नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहत असलेली कुटुंबेही गावाकडे परततात. त्यामुळे उत्साही वातावरण तयार होते. कानुबाई उत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यातील अनेक कुटुंबे गावाकडे आली आहेत. त्यामुळे गजबज वाढली होती. रविवारी कानुबाईची स्थापना, रोटपूजन व सोमवारी विसर्जन असे स्वरूप उत्सवाचे होते. रात्रभर भजन, कीर्तन विविध धार्मिक कार्यक्रमांच्या रेलचेलसह कानुबाईचे गुणगान गाणारी गीते म्हणत नाचण्याचा आनंद आबालवृद्धांनी लुटला. सोमवारी सकाळी देवीची आरती व पूजा केल्यानंतर डोक्यावर बाजवट ठेवून देवीला गाव व परिसरातील नदीकडे नेत निरोप देण्यात आला. नंदुरबार शहरातील पश्चिमेस असलेल्या नदीवर कानुबाईमातेचे विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी नवीन लग्न झालेले जोडपे, ज्यांनी नवस केले आहेत ते जोडपे किंवा एखाद्याकडे आनंदाने देवीची स्थापना केली आहे त्या कुटुंबातील महिला-पुरुष देवीला वाजतगाजत घरापासून माळीवाड्यातील धानोरा नाक्याकडे एकत्र आले. एकाच ठिकाणी शेकडो कानुबाया एका रांगेत आल्या. तेथे शेकडो हजारो महिला-पुरुष जमले.एकामागून एक मिरवणूक पुढे नदीकडे गेली. सकाळी आठपासून निघालेली मिरवणूक दुपारी बारापर्यंत नदीवर पोचली. तेथे देवीला अंघोळ घालून विसर्जन केले. पूजासाहित्य नदीच्या पात्रात सोडले. सर्वांनी अंघोळी केल्या. तसेच एकमेकांवर पाणी उधळत आनंद लुटला. अशा जल्लोषाच्या वातावरणात कानुबाईमातेला निरोप देत पुढील वर्षासाठी लवकर येण्याचे निमंत्रणच जणू भाविकांनी गीतांच्या माध्यमातून दिले.
ना. गावितांचा सहभाग
आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनीही कानुबाई विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत डोक्यावर कानुबाई धरून ठेका धरला. त्यांच्यासोबत त्यांची कन्या तथा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित याही उपस्थित होत्या. त्यांच्या या मिरवणुकीतील सहभागाने साऱ्यांचेच लक्ष व्ोधले होते.