हवेत गोळीबार करून आरोपी पळून जाण्यात यशस्वी

0
68

चांदसरला अवैध वाळू उपसाचा वाद उफाळला

साईमत।पाळधी, ता.धरणगाव ।प्रतिनिधी।

चांदसर गावाजवळील गिरणा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करत असतानाचे फोटो काढल्यावरून हवेत गोळीबार करून दहशत माजवून आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळी चोपडा भागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी घोलप, पो. नि.पवन देसले यांनी भेट देऊन तपासाबाबत माहिती दिली. आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना केली असल्याचे सांगण्यात आले.

येथून जवळील चांदसर गावातील नदीपात्रातून वाळू उपसा होत होता. तो रोखण्यासाठी तेथे चाऱ्या खोदून रस्ता बंद केला होता. त्यामुळे अवैध वाळू उपसा होत नव्हता. अवैध वाळू उपसा करण्यासाठी चांदसर, वाकटुकी येथील काही जण चाऱ्या बुजत होते. हे तेथील कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना समजले. तेव्हा त्यांनी तेथे जावून त्यांना त्याचा जाब विचारला. त्याचा राग येवून त्यांनी त्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याचवेळी वाकटूकी येथे राहणारे गोपाल कोळी यांनी त्यांच्याजवळ असलेली पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यावेळी तेथे एकच खळबळ उडाली तर गावात त्याचा आवाज झाल्याने तेथेही धावपळ उडाली. हवेत गोळीबार केल्यानंतर ते पळून गेले. घटनेची माहिती पाळधी पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी कोतवाल अमोल मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार योगेश ईश्वर कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश सोमा कोळी, मोहन गोविंदा कोळी, कल्पेश महेश पाटील, राहुल भीमराव कोळी, राहुल दिलीप कोळी (सर्व रा.चांदसर), गोपाल कोळी, दीपक कोळी (दोन्ही रा. वाकटुकी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स. पो. नि.प्रशांत कंडारे, मधुकर उंबरे, त्यांचे सहकारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here