मंगळवारी भव्य कार्यक्रम, एम.जे.ला पत्रकार परिषदेत माहिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
उत्तर महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या खान्देश कॉलेज एज्युकेशन (केसीई) सोसायटीच्या ८१ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यासाठी मंगळवारी, १६ सप्टेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संस्थेच्या संपूर्ण परिसरात सकाळी ९.४५ वाजता सुरू होणाऱ्या विशेष कार्यक्रमात सोसायटीच्या विविध शैक्षणिक संस्थांनी एकत्र येत एकाचवेळी त्यांच्या प्रगतीची आणि कार्याची झलक सादर करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. कार्यक्रमात १७ कार्यक्रमांचा समावेश असणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील यांनी एम.जे.कॉलेजमध्ये शनिवारी, १३ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संस्थेचे शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य अशोक राणे, मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे आदी उपस्थित होते. संस्थेच्या भविष्यातील योजना, नव्या अभ्यासक्रमांची आखणी आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संधीबाबतही माहिती देण्यात आली. कार्यक्रमासाठी क.ब.चौ. उ.म.वि.चे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. विशेष पाहुणे म्हणून उपकुलगुरू एस.टी. इंगळे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील राहतील. याप्रसंगी संस्थेच्या कार्याचा आणि वाटचालीचा परिचय देणारी चित्रफीत सादर करण्यात येणार आहे. त्याच्यातून संस्थेच्या गौरवशाली इतिहासाची झलक बघायला मिळणार आहे.
संस्थेच्या शैक्षणिक आणि वैचारिक जडणघडणीत देशातील अनेक नामवंतांचे संस्कारमय विचारसिंचन संस्थेला लाभले आहेत. आगामी काळात संस्था शोध, माहिती तंत्रज्ञानावर भर देऊन शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच संस्थेअंतर्गत उत्साही महत्त्वाकांक्षी वातावरण निर्माण करून आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्तरित्या शोधन करण्याचा प्रयत्न असणार आहे. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि संचालक मंडळ सतत खान्देशातील नव्हे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन, समाजाभिमुख आणि विद्यार्थी केंद्रित, रोजगाराभिमुख आणि कौशल्याधिष्टिन अभ्यासक्रम राबविण्यासाठी प्रयत्नरत असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.



