साईमत/ न्यूज नेटवर्क/यावल :
यावल वन विभागात वटवाघुळाच्या हत्येला उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक जबाबदार असे वृत्त गेल्या १ जुलै रोजी दैनिक ‘साईमत’मध्ये प्रसिद्ध होताच अज्ञात व्यक्तीने वडाच्या वृक्षावर लावलेली प्लास्टिकची पक्की जाळी यावल पूर्व वनक्षेत्रपाल यांच्या आदेशाने वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड यांनी काढली. त्यामुळे वडाच्या वृक्षावर येणाऱ्या शेकडो वटवाघुळांचे प्राण वाचणार आहेत.
यावल येथे नगरपालिकेपासून आणि यावल न्यायालयापासून हाकेच्या अंतरावर तसेच यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपालाच्या मुख्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर महाराणा प्रतापनगरमध्ये अंदाजे ४०० ते ५०० वर्ष वयाचे जुने मोठे वडाचे वृक्ष आहे. या वडाच्या मोठ्या झाडावर दररोज अंदाजे तीनशे ते चारशे वटवाघुळ यांचे येणे जाणे आणि वास्तव्य असते यांची हत्या करणे कामी काही अज्ञात व्यक्ती प्लास्टिकची जाळी लावून ठेवत असल्यामुळे वटवाघुळ या जाळीमध्ये अडकुन मरण पावतात त्या मृत वटवाघुळांना अज्ञात व्यक्ती कुठेतरी घेऊन त्याचा काहीतरी दुरुपयोग करतात. असे दबक्या आवाजात बोलले जाते.
यावल पूर्व वन विभागाने एका वडाच्या झाडावरील जाळी काढली तरी वडाच्या झाडावर जाळी लावणारे अज्ञात व्यक्ती कोण? त्याचा तपास कोण करणार? मृत वटवाघुळ यांचा नेमका कोण काय आणि कशासाठी कोणाच्या माध्यमातून उपयोग करतात? त्याची चौकशी व तपास करून गुन्हे दाखल झाले तरच अज्ञात व्यक्तींना आळा बसेल. वडाची झाडे जंगलात अनेक ठिकाणी असल्याने अज्ञात व्यक्ती कुठे कुठे प्लास्टिकच्या जाळ्या लावून वटवाघुळांची हत्या करीत आहे. त्याचा तपास लावणे गरजेचे झाले आहे.