ठाकरे यांची राष्ट्रवादी नेत्याच्या घरी पाहुणचार ; शिवसैनिक संतापले

0
46

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना संपवत आहेत, म्हणून पुन्हा भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. यात, बंडखोरांचा राष्ट्रवादीवर जास्त राग आहे. यासाठी काही घटनांचा दाखल दिला जातो आहे. शिवसेनेतील कोकणामधल्या असंतोषाबाबत आदित्य ठाकरे यांनी आदिती तटकरे यांचा घरी घेतलेला पाहुणचार कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते आहे.

रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत तनातणी सुरू होती. तटकरे गट – खासदार सुनील तटकरे आणि कन्या व जिल्ह्याच्या पालक मंत्री आदिती तटकरे हे शिवसेनेला त्रास देतात, अशी शिवसेनेच्या नेत्यांची तक्रार होती.

आमदार भरत गोगावले ही तक्रार घेऊन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले होते. उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा करून आदिती तटकरे आणि भरत गोगावले या दोघांना एकत्र भेटीसाठी बोलावत वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात तोडगा निघाला नाही. यामुळे शिवसेनेत राष्ट्र्वादीबाबत नाराजी वाढली. जिल्ह्याच्या पालक मंत्री आदिती तटकरे याना बदला, अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी होती.

अशा वातावरणात मार्च महिन्यात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत. माणगाव येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेची सभा घेऊन तटकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न रायगडमधील शिवसेना आमदारांचा आणि पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा होता. मेळाव्यात तिन्ही शिवसेना आमदारांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात सूर लावला. आमदारांच्या असंतोषाची दखल घेण्याऐवजी, हे व्यासपीठ तक्रारी करण्याचे नाही म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाच झापले! आपल्याच पक्षाच्या आमदारांचा पाणउतारा केला.

प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे हे तटकरे यांच्या घरी भोजनाला जाणार असल्याची कुणकुण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना लागली होती. पदाधिकाऱ्यांनी, आदित्य यांना आज तटकरे यांच्याकडे जाऊ नका, संघटनेत चुकीचा संदेश जाईल अशी विनंती केली. वाटल्यास पुढच्या दौर्‍यात जा पण आज जाऊ नका, असे सांगितले. मात्र आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला न जुमानता आदित्य ठाकरे तटकरे यांच्या सुतारवाडी येथील गीताबाग निवासस्थानी गेले. परिवहनमंत्री अनिल परबही त्यांच्यासोबत होते. या घटनेने रायगडमधील शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते दुखावले गेले होते. आता अशा घटनांची सर्व ठिकाणी स्थानिक पातळीवर चर्चा होते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here