आठ वर्षीय चिमुकलीच्या चेहऱ्यावर भीषण हल्ला
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील पिळोदे गावात बुधवारी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने दोन लहान मुलांवर केलेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भीषण घटनेत मृणाली दिनेश कोळी (वय ८) ही चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सलग दोन हल्ल्यांमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृणाली ही सुट्ट्यांनिमित्त पिळोदे येथे आपल्या मामाच्या घरी आली होती. बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी घराजवळ खेळत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. कुत्र्याने तिच्या गालावर व डोक्यावर अत्यंत क्रूरपणे चावा घेतल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिचा आक्रोश ऐकून आजूबाजूचे नागरिक धावून आले, तोपर्यंत गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत ती जमिनीवर पडलेली होती.
याच दरम्यान, त्या कुत्र्याने गावातील आणखी एका लहान मुलावर हल्ला करून त्यालाही जखमी केले. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.
गंभीर जखमी मृणालीला तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमा खोल व गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, पिळोदे गावच्या ग्रामसेवकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीची पावले उचलली आहेत. संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून देणाऱ्या व्यक्तीस ११०० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी पिळोदे गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
