मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सची जोरदार धडक २९ प्रवासी जखमी
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी भीषण अपघात घडला. सुरतहून अमरावतीकडे प्रवासी घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने २९ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रॅव्हल्स सुरत येथून अमरावतीकडे जात होती. दरम्यान, मुक्ताईनगरजवळील महामार्गावर एका ट्रकने काही कारणास्तव थांबले असताना ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने ट्रकला मागून धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की ट्रॅव्हल्समधील अनेक प्रवासी जागीच जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असलेल्या दहा प्रवाशांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली तसेच अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
