आ.एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत घेतला आ.चंद्रकांत पाटलांचा समाचार
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
‘हमारे अंगणे में तुम्हारा क्या काम है…’ असा फिल्मी डायलॉग मारत आ.चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या गावी चाळीसगावला पाठवावे, असा टोला विधान परिषदेचे आ.एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे संवेदना फाउंडेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. नुकतीच आ.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आ.एकनाथराव खडसे यांनी तीस वर्षात काय केले, यासह अनेक तारे तोडले होते. त्यावर आ.खडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. संवेदना फाउंडेशन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, आमदार खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते उपस्थित होते.
मतदारसंघात नव्हे तर जळगाव जिल्ह्यात मोठमोठे प्रकल्प मी मंत्री असतानाच पूर्णत्वास आलेले असल्याचे आमदार खडसे यांनी सांगितले. शंभर, दीडशे कोटींची कामे आणली की, लगेच आ.चंद्रकांत पाटील हे मोठा गाजावाजा करतात. परंतु या ‘नाथाभाऊ’ने हजारो कोटींची विकास कामे व प्रकल्प आणलेली आहेत. परंतु कधीही मोठेपणाचा आव आणला नाही. आता चंद्रकांत पाटील यांनी ९२ कोटी रुपयांची बोदवडसाठी पाणीपुरवठा योजना आणली. परंतु हे नाथाभाऊ यांच्या काळात ओडीए अंतर्गत त्या कालावधीतच ९६ कोटी रुपयांची योजना पूर्णत्वास आणली आहे. गेली पाच वर्षे बोदवड शहरातील व तालुक्यातील नागरिक पाण्याविना तडफडत होती तेव्हा पाणीपुरवठा योजना का आणली नाही…? त्यामुळे आ.चंद्रकांत पाटील यांचा यामागील हेतू मात्र शुद्ध नसल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांचा लाडका आमदार असलेल्या आ.चंद्रकांत पाटील हे ‘५० खोक्यातील’ आमदार आहेत. त्यांना पाच वर्षात ही योजना का आणता आली नाही, असा प्रश्नही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
भाजपमध्ये प्रवेश करतेवेळी माझ्यासोबत रोहिणी खडसेही होत्या. मात्र, हे धादांत खोटे आहे. त्यावेळी रोहिणी नव्हे तर खासदार रक्षा खडसे माझ्यासोबत होत्या. त्यामुळे आ.चंद्रकांत पाटील यांनी हे पिल्लू कुठून काढले? असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. मतदारसंघातील एकूण एक डांबरी रस्ते माझ्या काळातील झालेले आहेत. चंद्रकांत पाटील हे स्वखर्चातून शेती रस्त्यावर मुरूम टाकत असल्याचे सांगत आहे. यासाठी त्यांनी आमदारकीतून सात लाख रुपये काढलेले असल्याचा आरोपही आ.खडसे यांनी केला. मोठा गाजावाजा करीत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तालुक्यातील एक मोठा पुलाच्या बांधकाम कामाचे भूमिपूजन केले. परंतु त्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही.
कोथळी येथील मुक्ताई मंदिर जीर्णोद्धार कामाला मी सुरुवात केली. परंतु आ.पाटील यांनी जीर्णोद्धार कामासाठी एक रुपयाही दिला नसल्याचा आरोपही खडसे यांनी केला. १९५० पासून माझ्या बाप जाद्यापासून जमीनदार आहे. आ.चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेल्या पाच वर्षात एवढी मोठी प्रॉपर्टी कशी आली.
एदलाबादचे मुक्ताईनगर नामकरण व बोदवड, मुक्ताईनगर नगरपंचायत निर्मिती तसेच कुऱ्हा उपसा योजना, बोदवड उपसा योजना, वरणगाव उपसा योजना यासह कृषी महाविद्यालय, अल्पसंख्यांक पॉलिटेक्निक कॉलेज तसेच तापी पाटबंधारे विभागाची निर्मिती, केळी पिक विमा कृषी मंत्री असताना सुरू केला. मतदारसंघांत ३३ केव्ही उपकेंद्र आणली. यासह आपल्या काळातील विविध विकास कामांची माहिती देत त्यांनी ‘मी काय केले’ त्यापेक्षा तुम्ही काय ‘दिवे’ लावले ते सांगा.
रंग बदलणारा कोण…?
मुक्ताईनगर येथे औद्योगिक वसाहत एमआयडीसीचे काय झाले. मुक्ताईनगर येथे आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसविण्याचे सुरू असल्याचे समजते. परंतु हे नियमबाह्य करू नका, असाही सल्ला आ. खडसे यांनी दिला. शरद पवार, अजित पवार यांच्याकडे जात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावर निवडून आले आणि त्यांना सोडले. नंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले, त्यांनाही सोडले. नंतर एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेले. यावरून रंग बदलणारा कोण? असा टोला आमदार खडसे यांनी आमदार पाटील यांना लगावला.
माझी चिंता करू नये
माझ्या तब्येतीची काळजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी करू नये. मी त्यांच्या बापासारखा आहे आणि आता चांगला आहे. त्यामुळे त्यांनी माझी चिंता करू नये. ते माझी चिंता करीत आहेत, त्याचा मला आनंद आहे, असेही आ.एकनाथराव खडसे शेवटी म्हणाले.