विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्या ष्टीने अध्यापकांनी संशोधन केले पाहिजे. संशोधन करतांना ते अधिक प्रभावशाली व समाजोपयोगी होईल, अशा रीतीने झाले पाहिजे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि पुणे महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी उच्च श्रेणीतील उपकरणावर सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जैवशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. भूषण चौधरी, पर्यावरण भूशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस.एन पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास अकादमीतर्फे वलांजू भार्गव आदी उपस्थित होते.
कुलगुरू पुढे म्हणाले की, प्रशिक्षण शिबिरात अनेक विषयांवर मार्गदर्शन करत उच्च श्रेणीतील उपकरणासंदर्भात जी माहिती देण्यात आली. त्याचा निश्चितच फायदा भविष्यात सर्वांना होईल. प्रत्येक विद्यापीठात अध्यापक हे महत्वाचा घटक असतात. म्हणून त्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी असे प्रशिक्षण शिबिर महत्त्वाचे आहे. असे सांगत विद्यापीठात संशोधन व उपकरणांविषयी माहिती देत विद्यापीठाच्या ३५ वर्षात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
प्रशिक्षणात ४० प्राध्यापकांचा सहभाग
प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील ४० प्राध्यापकांनी सहभाग घेतला. उपक्रमामुळे शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्यात वाढ होणार आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता सुधारण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास प्रशिक्षणातील सहभागी प्राध्यापकांनी व्यक्त केला. शिबिरात सहभागी सर्व प्राध्यापकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. भूषण चौधरी यांनी सहा दिवसात प्रशिक्षण शिबिरात झालेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन तथा आभार प्रा. रक्षा कांकरिया यांनी मानले.