जळगावात वरिष्ठ-निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणास प्रारंभ
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
बदलत्या काळानुसार शिक्षकांनी स्वतःच्या ज्ञानात भर घालून बदल स्वीकारावा. अन्यथा, व्यवस्था तुम्हाला प्रवाहाच्या बाहेर टाकेल, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र पुणे आणि जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ए.टी. झांबरे विद्यालयात आयोजित सेवातंर्गंत वरिष्ठ वेतनश्रेणी-निवड वेतन श्रेणी शिक्षक प्रशिक्षणात ते बोलत होते. यावेळी डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, प्रशिक्षण समन्वयक डॉ. शिवाजी ठाकूर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे उपस्थित होत्या.
याप्रसंगी बालभारतीचे अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा’ विषयावर सखोल मार्गदर्शन केले. जिल्ह्याभरातून सुमारे १०९ शिक्षक प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. १० दिवसीय प्रशिक्षणास २५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
प्रशिक्षणाच्या वैशिष्ट्यांमध्ये प्रामुख्याने प्रत्येक तासिकेला ऑनलाईन हजेरी, ५० गुणांचे प्रशिक्षणा दरम्यान पाच समुह स्वाध्याय, ५० गुणांचे प्रशिक्षणोत्तर पाच वैयक्तिक स्वाध्याय, ५० गुणांची लेखी परीक्षा, ५० गुणांचे कृती संशोधन, प्रकल्प, नवोपक्रम आदींचा समावेश आहे. प्रशिक्षणाच्या गाभ्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार शिक्षणक्षेत्रात होत बदलांचा शिक्षकांना परिचय व्हावा, विद्यार्थी हा केंद्रबिंदू, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन स्वतःसह पालकांकडूनही होणार आहे. केवळ शैक्षणिक बुद्धिमत्तेला महत्त्व न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन सुलभक डॉ. अतुल इंगळे तर प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी आभार मानले.
शिस्तबद्ध अन् आनंददायी वातावरणात प्रशिक्षण
नवे बदल समजून घेण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे असते. अतिशय शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात प्रशिक्षण सुरू आहे. सुलभकांचे मार्गदर्शन शिक्षकांना लाभत असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी शिक्षक तथा जामनेर तालुक्यातील पहुरचे रहिवासी शंकर भामेरे यांनी दिली.



